मुंबई : मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीतील शांती सागर इमारतीत मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. ही आग इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये लागली होती, त्यामुळे संपूर्ण इमारतीत प्रचंड धूर पसरला. या घटनेने गोंधळ उडाला आणि काही रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकले.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंदाजे दीड तासात आग आटोक्यात आणली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
जखमी झालेल्यांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. त्यांना प्रामुख्याने धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये हर्ष भिसे, स्वीटी कदम, जान्हवी रायगावकर, प्रियंका काळे यांचा समावेश आहे. १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आगेमुळे विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असले, तरी अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.