मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री मुंबईतील गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) मंगळवारी (अनंत चतुर्दशी) रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
चर्चगेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि पहाटे ३ वाजता लोकल सुटेल. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या दरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.