पुणे : रेल्वे ट्रॅकवर दगड रचून ठेवणे किंवा अन्य प्रकारे रेल्वे ट्रॅकवर वस्तू ठेवून घातपात करण्याचा कट रचल्याच्या घटना मागील काही महिन्यांत समोर आल्या आहेत. यातून रेल्वे अपघात होण्याचा धोका आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षितेसाठी संशयित ठिकाणी रेल्वे प्रशासनाला सीसीटीव्ही बसविण्याचा सूचना दिल्या आहे. त्यानुसार रेल्वेच्या पुणे विभागात ट्रॅकवर २० ठिकाणी सीसीटीव्हीa कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसोबत रेल्वे सुरक्षा बलाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये गुप्तचर यंत्रणेने रेल्वे प्रशासनाला पुणे विभागातील काही संशयित ठिकाणे सांगितली आहेत. त्याठिकाणी घातपाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. संवेदनशील भागातून जाणार्या ट्रॅकची माहितीही गुप्तचर यंत्रणेकडून दिली आहे.
पुणे परिसरात जवळपास २० संशयित ठिकाणी आढळली असून, या २० ठिकाणांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. आता, लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून जेणेकरून रेल्वे संदर्भातील घातपाताच्या कृतींना वेळीच आळा घालता येईल. तसेच, या संवेदनशील भागातील गस्त वाढवण्यात येणार असून विविध स्तरावर सुरक्षा संदर्भातील उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.