भांडुप : भांडुपमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले असून दुचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पडलेल्या रस्त्यावरील भेगा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवण्यावर बंदी घातली असतानादेखील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीच्या नावाखाली पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवल्याचे दिसून येते.
भांडुप (प.) रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकीचे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भांडुप पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याच परिसरात असलेल्या पार्किंगसाठी येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांचा तसेच नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसांपूर्वीच या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघाताची घटना घडली होती. असे अपघाताचे प्रकार वारंवार घडू नयेत, यासाठी स्टेशन परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरुस्ती न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा अथवा डांबरी बनवावा, अशी मागणी वराडे यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे तसेच मध्य रेल्वेच्या भांडुप स्टेशन मास्तरांकडे केली आहे.