पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितली माहिती
ठाणे : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या ! ही भक्तांची हाळी यंदा गणपती बाप्पाने ऐकली असुन पुढल्या वर्षी गणपती बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. दीड दिवसाच्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात गणेशभक्तांनी निरोप दिला. भक्तांची हीच हाक बाप्पाने देखील ऐकली असून पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन खरोखरच लवकर होणार आहे. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले.
या विषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की, यावर्षी ०७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन झाले तर गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी होत आहे. पुढच्या वर्षी गौरी- गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. पुढच्या वर्षी मंगळवार ०२ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशी ११ व्या दिवशी म्हणजेच शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे.
वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. संपूर्ण राज्यभरासह गणेशोत्सव प्रसिद्ध असणाऱ्या कोकणात देखील दीड दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे मोठ्या जयघोषात, जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले. यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. यावषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले.
पुढील ११ वर्षातील श्रीगणेश चतुर्थी
- बुधवार २७ ऑगस्ट २०२५
- सोमवार १४ सप्टेंबर २०२६
- शनिवार ४ सप्टेंबर २०२७
- बुधवार २३ ऑगस्ट २०२८
- मंगळवार ११ सप्टेंबर २०२९
- रविवार १ सप्टेंबर २०३०
- शनिवार २० सप्टेंबर २०३१
- बुधवार ८ सप्टेंबर २०३२
- रविवार २८ ऑगस्ट २०३३
- शनिवार १६ सप्टेंबर २०३४
- बुधवार ५ सप्टेंबर २०३५