पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग व विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामधील पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेश परीक्षेचा (पेट) निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी २ हजार ७६१ विद्यार्थी पात्र, तर ६ हजार ३४६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.
विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पीएचडी प्रवेश पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यासाठी १० हजार ७५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ हजार ६४५ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले. विद्यापीठातर्फे लवकरच प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठातील विभाग व संलग्न संशोधन केंद्रामधील सुमारे १२०० जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, स्वायत्त महाविद्यालयांमधील रिक्त जागांची संख्या अद्याप यात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन स्वतःचा निकाल डाऊनलोड करून घ्यावा, असे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.