बाळाची आई मद्यधुंद असताना रात्री बाळ दूध पिताना झाले काही असे…
अमरावती : धामणदस गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्रीच्या चुकीमुळे तिच्या पोटच्या मुलाचा जीव गेला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नेमके प्रकरण काय?
एका २५ वर्षीय महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पहिलेच बाळंतपण असल्याने ती प्रसूतीनंतर बाळासह माहेरी धामणदस येथे होती. दरम्यान, ६ सप्टेंबरला रात्री ती बाळाला घेऊन खाटेवर झोपली. तिने मद्यपान केले होते. रात्रीच्या सुमारास दूध पिताना ते बाळ आईच्या अंगाखाली दबले. यात बाळाचा श्वास गुदमरला आणि बाळाचा मृत्यू झाला.
बाळाची आई मद्यधुंद असल्यामुळे आपल्याच पोटचा गोळा अंगाखाली आला हे तिला सकाळपर्यंत लक्षात आले नाही. सकाळी बाळ रडत नव्हते. त्यामुळे बाळ दगावल्याचे कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तत्काळ ही माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, बाळाच्या शरीरावर कोणतेही व्रण नव्हते. मात्र, तोंडातून दूध बाहेर आले होते व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी पाठवला. अहवालात बाळाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बाळाच्या आईचीसुद्धा वैद्यकीय तपासणी केली. ती झोपली होती तिथे तिने ओकारी केल्याचे दिसत होते. दारूचा वास येत होता. यामुळे ती घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत होती हे समोर आले. बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गुन्हा आईविरुद्ध दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार तथा सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली.