पुणे : महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीला प्रवाशांची पसंती वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत प्रवासी संख्या दुप्पट झाली असून, त्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे.
त्यामुळे एसटी महामंडळाने पुणे विभागाला नव्या २१५ गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीआधीच एसटीच्या ताफ्यात या बस दाखल होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागात सद्यस्थितीत ८१५ बस आहेत. आता नव्या २१५ बस दाखल झाल्यावर एकूण बसची संख्या एक हजार २५ एवढी होणार आहे. या बस पुणे, मुंबईसह अन्य मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीत ज्येष्ठ नागरिक, महिलांना प्रवास करण्यास सुखकर होणार आहे.
अनेक गाड्यांचे आर्युमान दहा वर्षांपेक्षा जास्त झाल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे; परंतु आता नवीन बस पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्यावर प्रवासी सेवा सुधारणार आहे. प्रवासी संख्येत वाढ झाली असली, तरी बस संख्या अपुरी पडत आहे.
यापूर्वी पुणे विभागातून ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये ३० ते ४० हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. सध्या पुणे विभागात दररोज जवळपास एक लाख प्रवासी वाहतूक होत आहे. यातून सुमारे १ कोटी ३० ते ४० लाख इतका महसूल एसटीकडे जमा होत आहे.
सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणखी वाढणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे बस नियोजनावर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळाकडून महिला आणि ज्येष्ठांना सवलती दिल्यामुळे महिला प्रवाशांची वाढतच आहे. दररोज साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त महिला प्रवास करत आहेत.