सोलापूर : उजनी धरण सध्या १०४ टक्के (११९.३० टीएमसी) भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. मागील ३७ दिवसांत धरणातून तब्बल ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. पण, काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी आज बंद करण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
सध्या उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, बोगद्यातून २०० क्युसेक, कालव्यातून (कॅनॉल) १६०० तर विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. सध्या धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः १० ऑक्टोबरपर्यंत जैसे थे राहणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून विहिरी, गाव तलाव, मध्यम, लघू प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.
त्यामुळे आता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत. धरणातील पाणीसाठा उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.