Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीSanjay Nirupam : काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा जगासमोर आला!

Sanjay Nirupam : काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा जगासमोर आला!

शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

भारतात अशांततेसाठी राहुल गांधींची अमेरिकन शक्तींशी हातमिळवणी

राहुल गांधींचे वक्तव्य उबाठा आणि शरद पवारांना मान्य आहे का?

मुंबई : अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला. आरक्षणविरोधी भूमिका घेऊन बांग्लादेशप्रमाणे भारतात अशांततेसाठी राहुल गांधीनी अमेरिकन शक्तींशी हातमिळवणी केली, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. राहुल गांधी यांची आरक्षणविरोधी भूमिका उबाठा आणि शरद पवार यांना मान्य आहे का? असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील आरक्षण संपवण्याचा विचार होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यावरुन निरुपम यांनी गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. यासंदर्भात निरुपम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एनडीए विरोधात संविधान बदलणार, आरक्षण बंद करणार असे फेक नरेटिव्ह पसरवले होते. लोकांच्या भावना भडकवल्या, त्यांना भयभीत केले होते. आता राहुल गांधी स्वत: संविधानाची मूल्य संपवण्याचे प्रयत्न करत आहेत, असे निरुपम म्हणाले.

महाराष्ट्रात शाहु, फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारे राजकीय पक्ष राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेशी सहमत आहेत का? ओबीसी समाजाचा वर्षानुवर्ष राजकारणासाठी वापर करणारे नेते राहुल गांधींच्या आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचाराशी सहमत आहेत का असा प्रश्न निरुपम यांनी विरोधकांना विचारला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. ओबीसी समाज आरक्षण बचावासाठी आंदोलन करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आरक्षणाबाबत वेगवेगळ्या भूमिका असून त्यांना राहुल गांधीचे विचार मान्य आहेत का? असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला.

राहुल गांधी आणि अमेरिकेतील कट्टर इस्लामिक सिनेटर इल्हान ओमर यांच्या भेटीचा फोटो यावेळी निरुपम यांनी सादर केला. इल्हान ओमर यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. खासकरुन काश्मिरला स्वतंत्र करा, हा मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला होता. त्यामुळे त्यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कोणती चर्चा केली असा खरमरीत सवाल निरुपम यांनी उपस्थित केला. अमेरिकेने बांग्लादेशातील नागरिकांना भडकावून बांग्लादेशला बरबाद केले. त्यानुसार काँग्रेसकडून भारतात अशांतता पसरवण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली जात आहे, असा थेट आरोप निरुपम यांनी केला.

निरुपम पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने यापूर्वीही आरक्षण विरोधी भूमिका घेतल्या आहेत. १९७७ मध्ये आणिबाणी उलथवून जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले तेव्हा १९७८ च्या आसपास मंडल आयोगाची ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. जनता पार्टीचे सरकार गेले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी १० वर्ष भारताचे नेतृत्व केले मात्र मंडल आयोगाचा १९८० मध्ये सादर केलेला ओबीसी आरक्षणाचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवून ओबीसींवर त्यांनी अन्याय केला, अशी टीका निरुपम यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -