मुंबई : काल हार्बर मार्गावरील नेरुळ स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अनेक लोकलसेवा विस्कळीत झाल्या होत्या. याचा फटका मध्य रेल्वेवर देखील पडला होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. अशातच आजही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा स्थानकाजवळ गितांजली एक्स्प्रेसच्या (Gitanjali Express) इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याणवरून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान गितांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे कल्याणवरून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. सध्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली असून रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सततच्या लोकलसेवा विस्कळीत होत असल्यामुळे प्रवाशांकडून मध्य रेल्वेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.