मुंबई: वस्त्र हा एक विचार आहे. एक व्रत आहे. ती एक संस्कृती आहे. कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि आपल्या निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
निसर्गाची काळजी घेणेच नाही तर आपले आर्थिक धेय लक्षात घेऊन कपड्यांचा पुनर्वापर करणे ही केवळ आपली गरजच नाही तर आपले कर्तव्यही आहे.
आपण अनेकदा विचार न करता जुने कपडे फेकून देतो. परंतू असे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपले जुने कपडे पुन्हा जिवंत करू शकतो. तसेच त्यांना पुन्हा नवीन आणि घालण्यायोग्य बनवू शकतो.
यंदाच्या वर्षी पंचगंगा उत्सव मंडळ ‘वस्त्र एक विचार… एक व्रत… एक संस्कृती’ हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. जूने कपडे नवीन पद्धतीने करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.
याचाच एक भाग म्हणून पुनर्निर्मिती झालेले कपडे वाडा-मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील लहान थोर मंडळींना वस्त्र दान करण्यात आले.
मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी गोधडी काम कार्यशाळा घेण्यात आली. यात घरातील ठेवणीतल्या कपडयांपासून गोधडी बनविन्याचे धडे देत, गोधडीचे महत्व सांगण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पारंपारिक वस्त्रांबद्दल जन जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन केले.
कपड्यांचा पुनर्वापर (Recycle & Upcycle) हा यंदाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या सजावटीचा विषय आहे. या विषया संबधीची संपूर्ण सजावट तुम्हाला पाहता येणार आहे.
१. वाचनालयातून आपण पुस्तक घेऊन जातो व ठराविक दिवसांत परत देतो. वस्त्रांच्या बाबतीतही आपण असे करू शकतो. वस्त्रही घेऊन जाऊन ती पून्हा परत करू शकतो, या बद्दलची कल्पना साकारली आहे. वस्त्र संग्रहालय आणि पारंपारीक पोशाख त्यातून होणारी सांस्कृतिक जडणघडण यातून तुम्हाला दिसेल.
२. कपड्यांचे पत्रे तयार करण्यात आले असून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचप्रमाणे कपड्यांच्या विटा तयार करण्यात आल्या आहेत.
३. कपड्यांपासून पुस्तक निर्मिती झाली तर भविष्यात विद्यार्थ्यांसमोर आपण चांगले उदाहरण ठेवू. अभ्यासक्रमातील पुस्तके कपड्यांपासून तयार झाली तर त्यातून मुलांना पुनर्वापराची गोडी निर्माण होईल. हे दाखविण्यासाठी काही पुस्तकं तयार केली आहेत.
४. चांगली झोप ही फक्त गोधडीवरच येते, यावर संपूर्ण वैज्ञानिक अभ्यास करून त्याबद्दल महीलांना गोधडी कार्यशाळा घेत आपल्या या वारश्याचे महत्व सांगितले आहे.
उत्सव मंडळाची गणेश मूर्ती संपूर्ण शाडू मातीची आणि पर्यावरणस्नेही आहे तर सजावट संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. प्लास्टीक प्रमाणे वस्त्रदेखील ही उद्याची मोठी समस्या होऊ शकतेgane, हे लक्षात घेता, यावर्षी त्यावर प्रबोधनपर प्रकाश टाकण्यात आला आहे.
शीतवातोष्णसन्त्राणं लज्जाया रक्षणं परम् ।
देहालङ्करणं वस्त्रमतः शान्तिं प्रयच्छ मे ॥