पुणे : देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन उद्यापासून पुणे (Pune) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी (Ganesh Darshan) आणि देखावे पाहण्यास गर्दी होते.
गुरुवारपासून (११ सप्टेंबर) शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.