उत्तराखंड : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कालम सायंकाळी केदारनाथमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान मुनकटियाजवळ सोमवारी सायंकाळी उशिरा भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनाची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचे पथक दाखल झाले. पथकाकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. परंतु खराब हवामान, बर्फवृष्टी आणि सतत दगड, मातीचे ढिगारे पडत असल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. मात्र आज सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले असता पाच मृतदेह तर तीन जखमींना बाहेर काढण्यात आले.
जखमींची माहिती
पाच मृत व्यक्ती या मध्य प्रदेशातील घाट जिल्ह्यातील नेपावाली येथील राहणारे असल्याची ओळख पटली आहे. हे मृत व्यक्ती केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी पोहोचले होते. मात्र सोमवारी झालेल्या भूस्खलनात ते अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचसोबत भुस्खलनात सापडलेल्या तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दरड कोसळल्यानंतर बंद झालेला रस्ता काही वेळाने प्रवाशांना चालण्यासाठी खुला करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. सध्या राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.