
जाणून घ्या काय आहे नवी डेडलाईन?
मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातच राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील महिलावर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अर्ज करण्याची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. अशातच राज्य सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख सप्टेंबर महिन्यापर्यंत होती. मात्र आता ही तारीख वाढवून नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत. त्यांना अर्ज एडिट करता येणार आहे.
असा करा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु केली आहे. या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे. नव्या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, याआधी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करणाऱ्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.