मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासासाठी सर्वात मोठे साधन म्हणजे लोकल ट्रेन. या मात्र या लोकल ट्रेनचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत असून यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. मंगळवारी पहाटेपासून लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हार्बर मार्गावरील नेरूळ स्थानकाजवळ पहाटेपासून लोकल रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे येथील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल स्टेशनवरून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच पनवेल-ठाणे ही वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळेसच ही वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पनवेल, बेलापूर, वाशी या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, लोकलसेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन तास लागतील असे सांगितले जात आहे.