मुंबई: पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. ७ सप्टेंबरला पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नवदीप सिंहने सुवर्णपदक जिंकले. तर महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत भारच्या ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू सिमरन शर्माने कांस्यपदक पटकावले आहे. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता २९ झाली आहे.
भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ७ सुवर्ण, ९ रौप्य आण १४ कांस्यपदकांची कमाई केली आहे. भारत पदकतालिकेत सध्या १५ व्या स्थानावर आहे.
इराणी खेळाडूला केले डिसक्वालिफाय
अंतिम सामन्यात नवदीप सिहने दुसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटर दूर भाला फेकला. त्याच्या करिअरमधील हा बोस्ट थ्रो होता. खरंतर या स्पर्धेत इराणचा सादेह सयाह बेत ४७.६४च्या प्रयत्नासह टॉपवर होता. मात्र स्पर्धा संपल्यानंतर त्याला डिसक्वालिफाय करण्यात आले. यामुळे भारतीय खेळाडू नवदीपला फायदा झाला आणि त्याला सुवर्णपदक मिळाले. चीनच्या पेंगजियांग सुनला रौप्य पदक मिळाले.
दुसरीकडे महिलांच्या २०० मीटर स्पर्धेच्या फायनलमध्ये सिमरन शर्माने २४.७५ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा इलियास डुरंडने सुवर्णपदक पटकावले.तिने ही शर्यत २३.६२ सेकंदाचा वेळ घेतला.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक २०२०मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकाची कमाई केली होती. १९ पदकांसह भारताचे ते सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले होते.