मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नंट असल्यामुळे विशेष चर्चेत होती. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते अशा चर्चा देखील सुरू होत्या. अशातच दीपिकाला काल मुंबईतील रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. अशातच गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिंह कुटुंबीयांकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. आज दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
बॉलिवूडमधील कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे २०१८ साली लग्नबंधनात आले होते. मागील आठवड्यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन जन्मापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी, जीवन बदलणाऱ्या या क्षणाची तयारी केली. त्यानंतर आज दीपवीर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे, एका सुंदर मुलीचे स्वागत केले आहे. ऐन गणेशोत्सवातच गौराईचे आगमन झाल्यामुळे कुटुंबियांसह सर्व चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.