आळंदीमधून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर फटकेबाजी
आळंदी : वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज आळंदीच्या (Alandi) दौऱ्यावर आहेत. आळंदीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच बळीराजाला सुखी आणि समाधानाचे दिवस येऊ देत असे साकडे देखील घातले. त्यानंतर महाराज कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शांतीब्रम्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा-वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येण्याचे भाग्य लाभते, याहून दुसरे पुण्य काही नाही. आज गुरू-शिष्यांचा वाढदिवस आहे, यापेक्षा मोठं काय असू शकत. खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकार असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं स्थान नक्कीच मोठं आहे, असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा देखील साधला.
सरकारने आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, पण…
गेल्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने आजपर्यंत ६०० निर्णय घेतले. परंतु अनेक निर्णय हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले आहेत. महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. ‘मी सामान्य घरातला मुलगा आहे. आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १ हजार ५०० रुपयांत विकत घेता का? लाच घेता का? असे म्हणतात. विरोधकांकडून केवळ सरकारच्या योजना खोट्या असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना या रुपयांची काय किंमत’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर धारदार टिकास्त्र सोडले आहे.
त्याचबरोबर सरकारने महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलतीचे तिकीट दिले. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असे विरोधक बोलत होते. पण आज या निर्णयामुळे एसटी फायद्यात आली आहे. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही, कधीही फसवणार नाही. माझ्याकडे येणारा एकही व्यक्ती खाली हाती जाणार नाही, एवढी मोठी शक्ती मला द्यावी, असे मागणे मी परमेश्वराकडे करतो, असेही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.