Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजवेदेषु गणेशः

वेदेषु गणेशः

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गोलाकार सोंडेचा विशाल शरीराचा करोडो सूर्या समान तेजस्वी अशा विघ्नहर्त्याने भगवंत श्री गणेशाने आमचे सर्व कार्य कोणतेही विघ्न न येता पूर्ण करण्याची कृपा करावी.

आपल्या या वैदिक संस्कृतीमध्ये एक दयाळू देवता श्री गणेश विघ्नहर्ता, बुद्धिवंत, सामर्थ्यवंत, शक्तिवंत, रूपवंत देवता आहेत. प्रथम पूजास्थानी असणारी वैदिक देवता, मुलाधार चक्राची शासक आरंभ असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी यांचे पूजन होतेच होते. गणेश या संस्कृत शब्दाप्रमाणे अर्थ गण म्हणजे समूह तर ईश म्हणजे परमेश्वर. गणपती म्हणजे प्राणीमात्रांच्या समूहाचे रक्षण करणारा रक्षक.

पौराणिक कथेनुसार हत्तीचे डोके असलेली हिंदू देवता म्हणजे आपले भगवान श्री गणेश यांची उत्पत्ती, पौराणिक कथा आणि त्याचे सार याबद्दल अनेक गोष्टी आहेत. जरी ही देवता विचित्र वाटत असली तरी हे महादेव आणि पार्वतीचे पुत्र आहेत आणि याबद्दलची गोष्ट प्रत्येक हिंदूला माहीतच आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून वेद व्यासांनी डोळे मिटून भागवत कथा सलग दहा दिवस गणपतीला ऐकविली जी गणपतीने आपल्या दातांनी लिहिली. दहा दिवसांनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की, गणपतीच्या शरीरात एका जागी सतत बसून लिहिल्यामुळे अतिशय उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळील पाण्याच्या कुंडात वेद व्यासांनी त्यांना थंड केले. त्यामुळेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते आणि शीतल करण्यासाठी अनंत चतुर्दशीला विसर्जन.

वेदांपासून ते पुराणग्रंथांपर्यंत सगळीकडे श्री गणेशाचा उल्लेख आहेच. श्री गणेशाची दोन पुराणे आहेत. एक गणेशपुराण आणि दुसरे मुद्गल पुराण. श्री गणेशाशी संबंधित कथा आणि त्यांचे पूजन या धर्मग्रंथात सांगितले गेले आहे. गणपती म्हणजे बुद्धी आणि विद्येची देवता. गणपतीचे अनेक अवतार वर्णित आहेत. मुदगल पुराणानुसार आपल्या श्री गणेशाची ३२ मंगलरूप रूपं आहेत. श्री बाल गणपती, श्री तरुण, श्री वीर, श्री भक्त, श्री संकष्ट हरण, श्री सृष्टी, श्री योग, श्री वर, श्री ऋणमोचन, श्री शक्ती, श्री द्विज, श्री उदंड, श्री उच्चिष्ठ, श्री द्विमुख, श्री ढुंडी, श्री सिद्धी, श्री विघ्न, श्री हेरंब, श्री उद्ध, श्री सिंह, श्री क्षिप्र प्रसाद, श्री विजय, श्री क्षिप्र, श्री लक्ष्मी, श्री एकदंता, श्री महागणपती, श्री नृत्त, श्री त्र्यैक्ष, श्री एकाक्षर, श्री हरिद्रा, श्री ऋण मोचन, श्री दुर्गा. त्यानुसार भक्ताला त्याचे फळ मिळते.

आपल्या श्री गणेशाचे आठ अवतार आहेत जे त्यांनी राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी घेतले. त्यानुसार वक्रतुंड प्रथम अवतार जो ब्राह्मण स्वरूपी होता. ज्यांनी मत्स्यासुर राक्षसाचा म्हणजे मत्सर, ईर्ष्या यांच्यावर ताबा मिळविला. एकदंत या अवताराने मदासूर राक्षस म्हणजेच अहंकार आणि दंभ यावर आपला ताबा मिळविला, तर महोदर म्हणजे मोठे पोट ज्याच्या पोटात पूर्ण ब्रह्मांड सामावू शकतो जो वक्रतुंड आणि एकदंतचा संगम आहे ज्याने दानव मोहासुराचा वध केला. गजवक्त्र म्हणजे हत्तीचा चेहरा असणारा ज्याने लोभासूर राक्षसाला मारले. शक्ती आणि ब्रह्म यांचा संगम असणारा लंबोदर जो परमेश्वरनिर्मित असून राक्षस क्रोधासूर याच्यावर ताबा मिळविला. या पाचही अवताराचे वाहन मूषक होते. सहावा अवतार विकट यांनी कामासूर नावाच्या राक्षसाला नमविले. ही प्रकृतीची देवता असून यांचे वाहन मोर हे आहे. सातवा अवतार ब्रह्म संरक्षक निसर्गाचे प्रतीक ज्याने राक्षस ममासुरावर विजय मिळविला तो विघ्नराज त्याचे वाहन सर्प आहे.

धूम्रवर्ण यांचा रंग राखाडी निळसर असून महादेवाशी साम्य असणारा आहे. या अवताराचा उद्देश राक्षस अभिमानासूर याचा वध करण्यासाठीचा आहे. याचे वाहन हे अश्व आहे.

या सर्व अवतारांवरून एक गोष्ट लक्षात येते की, भगवान श्री गणेशाचे पूजन करणे म्हणजे मोह, क्रोध, द्वेष, अभिमान, वासना, लोभ, अहंकार, मत्सर या सर्वांवर मानवाने ताबा मिळविणे. त्यासाठी मन शांत ठेवण्याची गरज आहे आणि म्हणूनच गणपतीचे पूजन म्हणजे मनाची शुद्धता. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे विघ्न टळते व आपोआपच आपण शांतीपूर्ण आणि सुखी जीवन जगू शकतो म्हणूनच त्याला विघ्नहर्ता असे म्हटले.

गणेश पुराणातील दुसऱ्या खंडात गणेश जन्म कथा आहेत. पुराणांमध्ये यांचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी आला आहे. पद्म आणि लिंग पुराणांमध्ये शेवटच्या खंडामध्ये गणेश जन्म संबंधित कथा आहेत, तर चौथ्या खंडामध्ये लोभासूर आणि गजानन, क्रोधासूर आणि लंबोदर यांच्या कथा आहेत.

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ ना: शृण्वन्नूितभि: सीद सादनम्।।

ऋग्वेदातील दुसऱ्या खंडातील २३ व्या सुक्तामध्ये गणांचे अधिपती, ब्रह्मज्ञानाचे अधिपती असणारे, अध्यात्मिक ज्ञान असणारे, कीर्तीवंत सर्वश्रेष्ठ राजा म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत म्हणून संस्कृतमधील पहिलाच
मंत्र आहे.

एका पुरातन कथेनुसार नैमिष्यारण्यात एक कथाकार सूत यांनी ऋषीमुनींना या पृथ्वीवरील मनुष्य जन्माची (मनू) कथा ऐकविली आणि शेवटी कल्याणकारी महादेव आणि पार्वती पुत्र भगवंत गणपतीचे पूजन करण्यास सांगितले.यजुर्वेद, मैत्रयणीयसंहिता आणि तैत्तिरीय आरण्यकामध्ये दंतिथ, हस्तीमुखाई आणि वक्रतुंड असा उल्लेख आहे.

गणपती अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले. थर्व म्हणजे चंचल अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक. अथर्वशीर्ष म्हणजे बुद्धीला स्थिरता. भारतीय संस्कृती आणि संस्कारातील या गणेशपूजनात संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी तसेच ज्ञान, कला आणि संगीताची देवता सरस्वती हिची सुद्धा पूजा गणेशाबरोबर केली जाते. पुराणग्रंथानुसार श्री गणेशाच्या पत्नी रिद्धी सिद्धी असून त्यांची मुलगी संतोषी माता आहे. माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे विनायकाचा जन्मोत्सव.

या पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे गतिशील वाहन असणारे सर्व देव आणि बुद्धी चातुर्याने मूषकासारखे वाहन असताना शिवपार्वतींच्या म्हणजेच आई-वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रथम स्थानी येणारे श्री गणेश म्हणूनही आपण प्रथम पूजन करतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या कार्याचा आरंभ सुरुवात म्हणजे श्री गणेशा जो आपल्याला आपले कार्य करण्यासाठी शक्तिवंत, बुद्धिवंत करतो आणि आपले कार्य आपल्याला शुभ फलित होते. खरं तर परमेश्वरामध्ये लीन झाल्यास आपण पापमुक्त राहतोच कारण आपल्या मनात वाईट विचार कधीच येत नाही आणि आपण कधीही कोणाचे वाईट विचार करू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडून सत्कर्मच होते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरागत आलेले अनेक सण आपण साजरे करत असतो आणि म्हणूनच आपली आज संस्कृती टिकून आहे. काळानुसार आपल्याला आपले वेद, ग्रंथपुराण यांचे सुद्धा अध्ययन करावयास हवे.

पुढील लेखात गणपतीच्या पूजनात असणारा निसर्गाचा संबंध याबद्दल आपण पाहूया.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -