गणपती विशेष – लता गुठे
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन वाजत-गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी, गल्लोगल्लीत, शहरात तसेच गावात आज झाले आहे. घरामध्ये गणपती बाप्पा जेव्हा विराजमान होतात तेव्हा घराचे मंदिर आपोआपच होऊन जाते. या पवित्र वातावरणात कधी दहा दिवस संपतात ते समजतही नाही. यामध्ये गौरी आगमन, गौरीपूजन व गौरी विसर्जन, गणपती विसर्जन असे सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे होतात. आपल्याकडे सर्व असतातच यासाठीच की मरगळलेल्या मनाला पुन्हा चैतन्य ऊर्जा मिळावी. ही ऊर्जा मिळताना मनामध्ये पवित्र भाव असावा. परंतु आजकाल गणपती उत्सव पाहताना अनेक हिडीस गोष्टी पाहायला मिळतात. गणपतीच्या मिरवणुका त्यामध्ये नाही नाही ती गाणी ढोल-ताशे वाजवून त्यापुढे हिडीसपणे नाचणे हे टाळायला पाहिजे असे मला वाटते. कारण शहरांमध्ये रस्त्याच्या बाजूने घर असतात तिथे अभ्यास करणारी मुलं असतात, आजारी माणसं असतात. त्यांना आपल्याकडून त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला नको का?
अनेक पिढ्यांनपिढ्यांपासून गणेश उत्सवाचा सोहळा अतिशय मनोभावे साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत श्री गणेशाच्या आगमनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण गणेश दैवत हे बुद्धीची देवता आहे. तसेच तो विघ्नहर्ताही आहे. प्रथम पूजेचा शुभारंभाचा मान श्री गणेशाकडेच जातो. अशा गणाचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचे स्थान आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. अगदी आपल्याला समजायला, उमजायला लागल्यापासून आपण गणेश-
तत्त्वांशी जोडले जातो. शाळेत मुलाचे नाव घातले की नव्या कोऱ्या पाटीवर पहिले अक्षर श्री गणेशाय नमः हे आपल्या हातात हात घेऊन घरातील मोठ्या व्यक्तीने गिरविलेले असते. अशा या श्री बाप्पा मोरयाच्या विषयी आज जाणून घेऊया…
गणपती बाप्पाचे हत्तीची सोंड असलेले तोंड आहे. साऱ्या विश्वाचे ज्ञान समावेल असे मस्तक आहे. वाहन हे तुरुतुरु पळणारा उंदीर, मोठं पोट, सुपासारखे कान, चार हातांपैकी एका हातात कमळ सृजनाचे प्रतीक, दुसरा हात आशीर्वादासाठी, तिसऱ्या हातात शस्त्र लेख आणि चाैथा हात आकाशाच्या दिशेने उघडा. असे हे गणपतीचे सगुण साकार रूप प्रत्येकालाच हवेहवेसे वाटणारे. शंकर आणि पार्वती यांचे पुत्र गणपती. पत्नी रिद्धी, सिद्धी. आणि शुभ, लाभ हे अपत्ये आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाची नावे आहेत … प्रत्येकांच्या मनात गणपती विषयी जसा भाव तसा तो प्रत्येक रूपामध्ये प्रिय वाटणारा. कोणाची भक्ती मयुरेश्वरवर तर कोणाची विनायकावर अशा या गणपतीची एकूण ११ नावे आहेत. एकदंत, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, धुम्रवर्ण, भालचंद्र, गणपती, गजानन, विघ्नहर, अशा या अनेक रूपातील विनायकाच्या स्वरूपांमध्ये श्री गणेशाचे आपण दर्शन घेतो आणि बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो अशी प्रार्थना करतो. आजचा सुप्रसिद्ध गणपती मंत्र आहे, ॐ गं गणपतये नमः असा जप करून गणपतीला २१ दुर्वा वाहिल्या जातात. नंतर पंचोपचारे गणेशाचे पूजन करून मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. गंध, अक्षता, दीप, धूप, पत्री, फुले यामुळे घराचे व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण पवित्र होऊन जाते. या सर्व पवित्र वातावरणाच्या माणसाच्या मरगळलेल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
सर्व पूजाअर्चा करून जेव्हा आपण श्री गणेशाचे दर्शन घेतो तेव्हा आपले हात आपोआप जोडले जातात. आणि डोळे बंद करून श्री गणेशाच्या रूपाला आपण मनामध्ये अधिष्ठित करतो.
हिंदू धर्मामध्ये श्री गणेश पूजेला पहिला मान आहे तो अगदी वैदिक काळापासून. वैदिक काळात गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. त्या काळातील मंत्र गणानां त्वा गणपतिं हवामहे… असा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे आपल्या लक्षात येते.
जंगलात राहून दुसऱ्या प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी गणपतीच्या हातामध्ये अंकुश, कुऱ्हाड आहे असे चित्र पुरणातील गणपतीचे आढळते. जसा काळ बदलला तसे गणपतीचे स्वरूपही बदलले असले तरी मूळ तत्त्व मात्र तेच आहे.
भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लंबोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली असावी असेही संदर्भ मिळतात. नंतर आर्य भारतात आले आणि आर्य आणि अनार्य यांची संस्कृती एकमेकात मिसळल्यामुळे गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे. या काळामध्ये आर्यांनी शेती व्यवसाय केला. उंदीर पिकाचा नाश करतात. त्यामुळे उंदराचा सुळसुळाट कमी होण्यासाठी गणपती बाप्पाला उंदराचे वाहन केले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदीर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असेल.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव साजरा केला जातो या काळामध्ये भरपूर पाऊस पडून गेलेला असतो. धन-धान्यांने शेतं बहरून जातात. शेतकरी सुखावलेला असतो. त्यामुळे या सुगीचा प्रथम उत्सव गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये केला जातो.
श्री गणेशा ही विद्येची देवता आहे. तसेच ती कलेची ही देवता आहे. त्यामुळे कलाकार मंडळीही गणेश उत्सवामध्ये आपली कला सादर करण्यासाठी रंगून गेलेले असतात. बाल गणेशाचे मोहक रूप बाळगोपाळांना आपलेसे करते. लाडू मोदक असे गोड पदार्थ गणपतीबरोबर लहान मुलांनाही खूप आवडतात. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये बाळ गोपाळही रमून जातात. अशाप्रकारे कोणत्याही युगामध्ये कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होत नाही.
शेवटी जाता जाता… हे शब्द सन्मानार्थी श्री चरणी अर्पण करून श्री गणेशा तुला प्रार्थना करते..
सर्वांची दुःख दूर कर, वाईटांचा नाश कर, सर्वांचे कल्याण कर, जे दुःखी आहे पीडित आहेत, त्यांची दुःख, पिडा दूर कर… हे श्री गणेशा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा !