गणपती विशेष – भालचंद्र ठोंबरे
भारतीय धार्मिक संस्कृतीत गणपतीला विशेष मानाचे स्थान आहे. गणपती ही बुद्धीची व विघ्ननिवारण करणारी देवता मानली जाते. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्याच्या सुरुवातीला गणेशाची पूजा केली जाते. या गणेशाचा जन्म म्हणजे उत्पत्ती विषयी विविध पुराणात विविध आख्यायिका सांगितल्या जातात.
शिवपुराण व स्कंध पुराणानुसार एके दिवशी स्नानाला जात असताना माता पार्वतीने नंदीला दरवाजावर द्वारपाल म्हणून उभे केले. थोड्या वेळात महादेवाचे त्या ठिकाणी आगमन झाले. प्रत्यक्ष स्वामीच आल्याने नंदीने त्यांना न अडविता आत जाऊ दिले. मात्र या घटनेचा माता पार्वतीला अतिशय राग आला. स्वामी असल्याच्या कारणावरून नंदीने महादेवास विरोध केला नाही असे वाटल्याने अशी एखादी व्यक्ती हवी जी आपलीच आज्ञा पालन करेल. त्यामुळे माता पार्वतीने मातीचा एक पुतळा बनवून त्याला सजीव केले. एके दिवशी माता पार्वती स्नानाला जाताना त्या मुलास दरवाजाजवळ द्वारपाल म्हणून उभे केले. काही वेळाने महादेवांचे आगमन झाले. मात्र या मुलाने महादेवांना आत जाण्यास अटकाव केला. या वेळेस बालक व महादेवामध्ये घनघोर युद्ध झाले. मात्र बालकाची युद्धात हार झाली नसल्याचे पाहून क्रोधीत झालेल्या महादेवाने त्रिशूळाने मुलाचे शीर उडवले. पार्वतीला हे कळताच तिने आक्रोश केला, व आपल्या पुत्रास पुन्हा जीवित करण्याचा आग्रह धरला. महादेवाने आपल्या गणास उत्तरेकडे जाऊन सर्वात प्रथम जो कोणी दिसेल त्याचे शीर आणण्याची आज्ञा केली. त्यानुसार शिवगण उत्तरेकडे गेले असता प्रथम दिसलेल्या गजराजाचे शीर घेऊन आले. महादेवांनी ते शिर मृत बालकाला बसवून त्यास जिवंत केले व पुत्र म्हणूनही स्वीकारले. पुढे सर्व देवांना पूज्य ठरलेल्या या बालकाचे गणेश या नावाने प्रसिद्धी झाली.
मत्स व पद्म पुराणानुसार पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनविली. ती गंगेत टाकली. ती मोठी झाली. त्याला पार्वतीने व गंगेने आपला पुत्र मानले. हा पुत्र पुढे गणाधीपती झाला तोच श्रीगणेश म्हणजे गणपती.
वामन पुराणानुसार पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगाच्या मळापासून चार हातांची गजाननाची मूर्ती बनविली. महादेवाने त्यास पुत्र मानले व माझ्याशिवाय झालेले हे बालक म्हणून विनायक म्हणून ख्याती प्राप्त होईल व विघ्ननाशक असेल असा वर दिला.
लिंग पुराणानुसार देवांनी असूर व दैत्यांपासून रक्षण करण्याची मागणी महादेवांकडे केली. तेव्हा महादेवांनी स्वतःच्या शरीरापासून गणेशाची निर्मिती केली. त्याचे मुख हत्तीचे व हातात त्रिशूल होते. त्याला देवाचे विघ्नहरण करून उपकार करण्याचा आदेश दिला.
वराहपुराणानुसार देव व ऋषींनी महादेवांना भेटून विघ्ननिवारणार्थ नव्या देवतेची मागणी केली असता. शंकराजवळ एक बालक प्रगट झाला. त्याला पाहून सर्व मंत्रमुग्ध झाले. मात्र शंकराच्या शापामुळे बालकाचे मुख गजमुख व पोट मोठे झाले. शंकराच्या घामातून गणांनी जन्म घेतला व हा गजानन त्या गणांचा अधिकारी झाला.
गणेश चालीसानुसार पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी तप केल्याने श्री गणेश ब्राह्मणाच्या वेशात तेथे पोहोचले. पार्वतीने त्यांचे स्वागत केले. गणेशाने तुला तीव्र बुद्धीचा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. व ते अंतर्धान पावले व बालकाच्या रूपाने स्वतः पाळण्यात पहूडलेले पाहून पार्वती मातेला आनंद झाला. सर्व देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पार्वतीने शनि देवांनाही बालकाकडे पाहण्यास सांगितले. परंतु शनि देवाची दृष्टी पडताच बालकाचे मस्तक उडून गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी गरुडाला उत्तरेकडून जो पहिला प्राणी दिसेल त्याचे शीर आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे गरुडाने प्रथम दिसलेल्या हत्तीचे शिर आणले. महादेवांनी ते बालकाच्या मस्तकाच्या ठिकाणी लावून त्यावर पाणी शिंपडून त्यास जिवंत केले. सर्वांनी मिळून बालकाचे नाव गणेश ठेवले, व कोणात्याही कार्यप्रसंगी अग्रपूजेचा मान दिला.