क्राइम- अॅड. रिया करंजकर
लग्न झाल्यानंतर मूल नाही झालं तर अनेक दाम्पत्य डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतात. अनेकदा आर्थिक खर्चही जास्त होतो. पण आपल्याला मूल पाहिजे यासाठी काही दाम्पत्य खर्चाची पर्वा करत नाहीत. मोनिका आणि संतोष हे असं दाम्पत्या होतं की त्यांना लग्न झाल्यावर मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी डॉक्टर अगरवाल यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली व त्या ट्रीटमेंटमुळे मोनिकाला आपलं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होणार याची जाणीव होऊ लागली. मोनिकाला दिवस गेले म्हणून ती तिचा पती आणि सासरची-माहेरची सर्व लोकं खूश होती. कारण लग्नानंतर त्यांच्या घरामध्ये पाळणा हलणार होता. ती राहत असलेल्या ठिकाणावरून डॉक्टर अग्रवाल यांचं हॉस्पिटल खूप लांब होतं.
विक्रोळीला हॉस्पिटल असल्यामुळे ट्रेनने प्रवास करणं धोकादायक होतं म्हणून नातेवाइकांच्या सांगण्यावरून जवळच असलेलं एरोली येथील राजमाता जिजाऊ मुन्सिपल हॉस्पिटलमध्ये तिने सातव्या महिन्यांत नाव घातलं आणि ती त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती. सर्व काही व्यवस्थित होतं. नववा महिना सुरू झाल्यावर मोनिकाला सकाळी ५ वाजता कळा येऊ लागल्या. म्हणून ती आणि तिची सासू जवळच असलेल्या एरोलीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यांना त्यावेळी सिक्युरिटीने तिसऱ्या माळ्यावर पाठवलं. कळा जास्त येत होत्या, त्याच्यामुळे नाईट शिफ्टमध्ये असलेल्या डॉक्टर अर्चना यांनी चेक-अप केले असता बाळाची हार्ट्स बीट्स व्यवस्थित होती पण रिस्क नको म्हणून सिझरिंग करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर अर्चना यांनी सर्व तयारी केली होती. तोपर्यंत डॉक्टर अर्चनांची ड्युटी संपली आणि त्या ठिकाणी डॉक्टर स्वाती यांची ड्युटी सुरू झाली. डॉक्टर अर्चना यांनी स्वाती यांना सर्व समजावून सांगितलं व त्या निघून गेल्या. तोपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. पण डॉक्टर स्वाती यांचं असंच म्हणणं होतं की, जेवढे नॉर्मल होईल तेवढे आपण करूया. पण मोनिका हिला कळा सहन होत नव्हत्या आणि रक्तस्त्राव जास्त होत असल्यामुळे मोनिका ही स्वतः सांगत होती की माझं सिझरिंग करा मला सहन होत नाहीये. तरीही डॉक्टर स्वाती यांनी एक नर्स, तीन मावशा याच्या मदतीने मोनिकाचं नॉर्मल होण्यासाठी प्रयत्न करत होते.
मोनिका कळा सहन करण्याच्या पलीकडे गेली होती. शेवटी तिला ओटीमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी बेडवर जो रक्तस्त्राव झाला होता तो हॉस्पिटलमधल्या कुठल्या स्टाफने साफ न करता मोनिकाच्या जावेने तो साफ केला. तिथल्या मावशीने ती बेडशीट साफ करण्यास नकार दिला. सकाळी डॉक्टर अर्चनाने सर्व तयारी करूनही डॉक्टर स्वाती यांनी ओटीमध्ये न्यायला अनेक तास घालवले. सकाळी ६ वाजता अॅडमिट झालेली मोनिका ५ वाजत आले तरी तिची प्रस्तूती करण्यात आली नव्हती. व्याक्युम लावण्यात आला होता तोही उडून गेला. बाळ मात्र पोटातच अडकून होतं. सरते शेवटी सिझरिंग करण्यात आलं. बाळ बाहेर आल्यानंतर ते रडलं नाही. तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. त्यावेळी नर्स, मावशी तिच्याजवळ आले. तिला घाबरू नकोस म्हणून हिम्मत देऊ लागले. बाळाच्या गळ्यामध्ये नाळ अडकल्यामुळे बाळ वाचू शकलं नाही असं कारण देण्यात आलं. मोनिकाचा धीर खचला. नऊ महिने ती त्या बाळाची वाट बघत होती आणि अचानक बाळ गेल्याच तिला सांगण्यात आलं. या बाळासाठी त्यांनी दोन ते तीन लाख खर्च केले होते.
सकाळी डॉक्टर अर्चना यांनी सगळं नॉर्मल आहे असं सांगितलं होतं. मोनिका आपण सिझरिंग करूया असं सांगत होती. जर लवकर सिझरिंग झालं असतं तर कदाचित ते बाळ वाचलं असतं. पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामध्ये बाळ मात्र दगावलं. बाळ तर गेलं पण अनेक यातना मोनिकाला देऊन. डॉक्टर स्वातीच्या हलगर्जीपणाने हे सर्व घडलं होतं. सिझरिंग केल्यानंतर डॉक्टर स्वाती यांनी येऊन तिची चौकशी केली नाही. बाळाच्या गळ्याभोवती जर नाळ अडकली होती, तर ती सोनोग्राफीमध्ये दिसली असती ना. पण ती काही दिसली नाही आणि सिझरिंग करायला लेट झाला आणि त्यात बाळ गेलं. बाळाची वाट पाहणारी आई आणि त्याच्यासाठी खर्च करणारे वडील यांच्या पदरात मात्र निराशा आली आणि ती मात्र निराशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आली. आता परत जर त्यांना बाळ हवं असेल तर तेवढा खर्च त्यांना जमेल का. यासाठी सर्वस्वी हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टर स्वाती या जबाबदार आहेत. मोनिकाला न्याय हवा आहे आणि ते हॉस्पिटल मोनिकाला न्याय मिळवून देईल का?