कथा- रमेश तांबे
गेल्यावर्षीच आम्ही आमच्या नव्या घरात राहायला आलो होतो. आमचे नवे घर एका छानशा कॉलनीत होते. तेथे माझ्या वयाची खूप मुले होती. त्यामुळे रोज खेळ खेळण्याला उधाण यायचे. शिवाय कॉलनीत सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे. पण इथला गणेशोत्सव मी प्रथमच अनुभवणार होतो. पाहणार होतो. कॉलनीच्या मधल्या मोकळ्या जागेत एका कडेला एक छोटासा मंडप उभारला गेला आणि पंधरा दिवस आधीपासून गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली. विशेष म्हणजे ही सर्व तयारी छोटी मुलेच करीत होती. रंगीबेरंगी कागदाच्या भिंती, सवह्यांच्या पुठ्ठ्यांचे मखर, पशुपक्ष्यांच्या, झाडाझुडपांच्या, डोंगर रांगांच्या चित्रांची सर्वत्र सजावट करण्यात आली. मीही माझ्या परीने त्यात सामील झालो. रोज कोणत्या आरत्या म्हणायच्या, कोणता प्रसाद वाटायचा यावर चर्चा सुरू झाली. मुलांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
उद्या गणपतीचे आगमन होणार होते; म्हणून आम्हा बालगोपाळांची आदल्या दिवशी एक छोटीशी सभा बोलवली होती. पुढील दहा दिवस काय काय करायचे? कोणते सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम करायचे? कोणते खेळ ठेवायचे? याची चर्चा करायची होती. संध्याकाळी बरोबर ७ वाजता सभा सुरू झाली. तेवढ्यात कॉलनीत कोणाशीही कधीही न बोलणारे, न मिसळणारे लेलेकाका आमच्या सभेत हजर झाले. येताना त्यांच्या हातात एक भली मोठी पिशवी होती. ते येताच आम्ही सारे गप्प बसलो. लेलेकाका बोलू लागले, ‘‘बालमित्रांनो मला सांगा पुढील दहा दिवस तुम्ही कोणता सण साजरा करणार आहात?” मुले म्हणाली, “गणपती बाप्पाचा.” काका पुढे म्हणाले, “मग मला सांगा हा गणपती बाप्पा कशाचे दैवत आहे?” मग मीच हात वर करून म्हणालो, “बुद्धीचे, ज्ञानाचे!” काका म्हणाले, वारे पठ्ठ्या शाब्बास” काका पुढे बोलू लागले, “मग मला सांगा बुद्धीच्या दैवताची पूजा कशी करायची. गोडगोड प्रसाद खाऊन, नाचगाण्यांचे कार्यक्रम करून, विविध मनोरंजनाच्या स्पर्धा ठेवून ! ही पूजा गणपती बाप्पाला कशी आवडणार !” काकांचे बोलणे ऐकून आम्ही सारी मुले विचारात पडलो.
मग काकांनी पिशवीतून पुस्तके बाहेर काढली आणि म्हणाले, “हे बघा मुलांनो मी तुम्हाला आवडणारी गोष्टीची पुस्तके आणली आहेत. मला असे वाटते की, पुढील दहा दिवसांत आपण सर्वांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करायचे. ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायचा. शेवटच्या दिवशी प्रत्येक मुलाने व्यासपीठावर येऊन काय वाचले. त्याला किती ज्ञान मिळाले याबद्दल दोन शब्द बोलायचे.” हे विचार ऐकून सारी मुले अचंबित झाली. खरं तर मला पुस्तके वाचायला खूपच आवडायची. त्यामुळे मी लगेच हात वर केला आणि म्हणालो, “होय काका खूप छान आहे कल्पना!” मग माझ्याबरोबर साऱ्यांनीच ही कल्पना उचलून धरली. नंतर काकांनी साऱ्या मुलांना पुस्तके वाटली आणि आमचा आगळावेगळा गणेशोत्सव सुरू झाला. दहा दिवसांचा वाचन सोहळा !
गणपती येऊन दोन दिवस झाले तरी मुलांचे कार्यक्रम सुरू झाले नाहीत. म्हणून कॉलनीतले लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. प्रत्येक मुलगा घरात बसून पुस्तक वाचतोय हे चित्र घरोघरी दिसू लागले. हे पाहून मुलांच्या आई-बाबांनाही नवलच वाटू लागले. मग काय मुलांनी सुट्टीचा छान उपयोग करीत जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. पुस्तके वाचून झाल्यावर आपापसात बदलून घेऊ लागली. फक्त संध्याकाळी आरतीच्या वेळी मुले एकत्र जमत. बस्स! मग पूर्ण वेळ कॉलनी शांतच. लोकांनाही कळेना हे मुलांनी काय चालवले आहे !
गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस उजाडला. एक छोटेखानी व्यासपीठ उभारले गेले. समोर एक माईक उभा केला गेला. संपूर्ण कॉलनीला आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे खूपच गर्दी जमली. प्रथम लेलेकाका समोर आले. त्यांना बघताच कॉलनीतले लोक अचंबित झाले. कारण कधीही कुणाशी न बोलणारे लेलेकाका चक्क व्यासपीठावरती आले. लेलेकाका बोलू लागले. सर्व उपस्थित गणेशभक्तांनो. गणपती दरवर्षी येतात. त्या दहा दिवसांत आपण खूप मजा करतो. धमाल करतो. आरत्या म्हणतो. पण या बुद्धीच्या दैवताची पूजा अशाने होते का? यावर्षी आमच्या बाळगोपाळांनी या ज्ञानाच्या दैवताची पूजा पुस्तके वाचून केली आहे आणि एक नवा पायंडा पाडला आहे. मग एक-एक मुलगा-मुलगी पुढे येऊन मोठ्या धाडसाने त्या दिवसांत आम्ही काय वाचले, किती माहिती मिळवली, त्यांना हा उपक्रम किती छान वाटला याबद्दल बोलले.
एक आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केल्याचे समाधान प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होते. आपल्या मुलांचे प्रगल्भ बोलणे ऐकून उपस्थित लोकांच्या डोळ्यांत पाणी तराळले. अशाप्रकारे यावर्षीचा गणेशोत्सव खूप आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडला.“हा वाचन संकल्प यापुढेही कायम चालू ठेवण्याचा निर्णय बाळगोपाळांनी घेतला आहे.” असे लेले काकांनी जाहीर करतात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.