प्रतिभारंग- प्रा. प्रतिभा सराफ
पूर्वी कोणाच्याही घरी, कोणत्याही वेळेस गेलो तरी ते घर माणसांनी भरलेले असायचे. शिवाय सणवाराच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी गेल्यावर त्या घरांमध्ये आणखी काही अधिकची माणसे असायची. कोणीही कोणाच्याही घरी अगदी सहज जायचे आणि ज्या घरी जायचे त्या घरातली माणसे त्यांचे स्वागत करायची. संयुक्तिक कुटुंबांचे आता विभक्त कुटुंबांमध्ये रूपांतर झाले. अशा या कुटुंबांमध्ये दिवसभर घराला कुलूपच असते. त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी माणसेच घरात नसतात. शिवाय आता कोणताही माणूस असा सहज उठून कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. ज्या घरात आपण जाणार आहोत त्या घरातल्या माणसांनाही असे अचानक कुणी आलेले आवडत नाही. अगदी ठरवून सांगून माणसे एकमेकांच्या घरी जातात. भेटीगाठीचा आनंद यजमानांना आणि पाहुण्यांनाही फार होतो, असे काही दिसत नाही. जो तो आपापला मोबाइल घेऊन जगातल्या कोणत्या तरी माणसाशी प्रेमाचा संवाद साधत असतो आणि जी माणसे समोर आहेत त्यांच्याशी साधा संवाद साधण्यातही त्यांना वेळ किंवा आनंद नसतो.
कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर माझ्या लक्षात येते की त्यांच्यासोबत जर लहान मुले असतील, तर ते एका खुर्चीवर किंवा आई-वडिलांच्या मांडीवर बसून मोबाइलवर काहीतरी पाहत असतात. मोठी माणसे मोबाइलमधून थोडासा वेळ काढून, गप्पा करता करता आणि खाता-पितांना थोडेफार अन्न त्यांना भरवतात. इथे ‘मोबाइल’ या यंत्राबद्दल मला कोणतीही तक्रार करायची नाही आहे, तर या लेखातून मला हे सांगायचे आहे की, माणसे माणसांपासून दुरावली आहेत. दुरावल्यामुळे तुटलेपण आहेच !अलीकडे छोट्या-मोठ्या कला, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाला मला वक्ता म्हणून किंवा साधे रसिक/ प्रेक्षक म्हणून जरी बोलवले तरी मी आवर्जून जाते. तसे कोणाकडेच वेळ नसतो; परंतु काही कामे बाजूला सारून, काही कामे लवकर उरकून मी जाण्याचा प्रयत्न करते. इथे काही मंडळी भेटतात. विचारांची देवाण-घेवाण होते, सोबतीने खाणेपिणे होते. कधी सोबतीने प्रवासही होतो. थोडा वेळ का होईना; परंतु मोबाइलपासून माणसांपर्यंतचा प्रवास साधता येतो. कितीही नाही म्हटले तरी प्रत्येक सहप्रवाशांकडून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकता येते.
‘झिम्माड’ या समूहातर्फे आयोजित केलेल्या नाट्य-कला-साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही नाशिकला गेलो होतो. अतिशय उत्तम कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन, आम्ही झिम्माड परिवार परतीच्या प्रवासाला लागलो. पावसाळ्याचे दिवस त्यातही रस्त्याचे काम चालू होते. सव्वाआठच्या सुमारास असणारी ट्रेन आम्हाला कसाऱ्यावरून पकडायची होती. वेळेचे नियोजन करून आम्ही बाहेर पडलो होतो; परंतु भयानक वाहतूक कोंडीमध्ये सापडलो आणि सहाजिकच आठ, नऊ आणि दहाच्या सुमारासची गाडीसुद्धा कसारा स्टेशनवरून व्यवस्थित सुटली; परंतु आम्ही त्या वेळेत पोहोचू शकलो नाही. आम्ही कसाऱ्याला पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि पहाटे साधारण पावणेचारच्या सुमारास लोकल होती.
पहिल्यांदाच अशा तऱ्हेने स्टेशनवर रात्रभर राहण्याचा प्रसंग आला होता. बरोबरीचे सगळे साहित्यिक आणि रसिक खूप आनंदात गप्पा मारत होते, चहा-कॉफी घेत होते. मध्यरात्री चालण्याचा व्यायामाही करत होते. तसे स्टेशन बऱ्यापैकी रिकामे होते. मी चक्क एका कट्ट्यावर मस्त झोपले. आसपास अत्यंत जवळची माणसे होती. त्यामुळे सामानाची आणि मध्यरात्री गाडी आल्यावर उठायची काळजी नव्हती. पहाटे रेल्वेगाडीत चढलो तेव्हा असे वाटले की आता मुंबईपर्यंत हातपाय पसरून काय, तर चक्क झोपूनसुद्धा प्रवास करता येईल आणि पुढच्याच स्टेशनवर हा भ्रमाचा भोपळा फुटला. प्रत्येक स्टेशनागाणिक माणसांचे लोंढे वाढत होते. त्यात काही ऑफिसला जाणारी मंडळी होती; परंतु मोठ्या प्रमाणात विक्रेते होते. केळीची पाने, फळ-फुले, पालेभाज्या वा तत्सम अनेक भाज्या, मोठमोठ्या गोणपाटात बांधलेल्या घेऊन त्यांनी सामानाबरोबर स्वतःला या गाडीत लोटले होते. चौथा सीटवर किंवा भारतीय बैठक मारून ही मंडळी चक्क काम करत होती. म्हणजे शेंगांच्या जुड्या बाधणे, काही शेंगांमधून दाणे बाहेर काढणे, प्लास्टिकच्या छोट्या पिशव्यांमध्ये अनेक प्रकारची फुले बांधून फुलपुड्या तयार करणे इत्यादी. काही चाकरमानी आपल्या बॅगा पोटाशी घट्ट धरून निद्रादेवीच्या अधीन झालेले होते.
पहाटे चारच्या सुमारास ट्रेनमध्ये चक्क उभे राहून प्रवास करणारे प्रवासी पाहून अंगावर काटा आला. अर्धवट झोपेत घरच्यांचे स्वयंपाकपाणी आवरून, स्वतःचा डबा भरून या बायका, पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून, किती कष्टप्रद प्रवास करत आहेत हे लक्षात आले. मुंबईकरांना हा प्रवास नवीन नाही तरीही इतक्या पहाटे, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करणारी माणसे पाहून त्यादिवशी कसेसेच वाटले. मुंबईची जीवनवाहिनी असणारी ही रेल्वे मुंबईपासून पनवेल, कसारा, कर्जत, पालघर अशा असंख्य दिशांना, रात्रीचा काही थोडा वेळ सोडला तर अखंड धावत असते. लाखो प्रवासी दिवसभर त्यातून प्रवास करतात. या प्रवासाचा आनंद मी अनेकदा घेतला आहे, त्याच्या अस्विस्मरणीय आठवणीही आहेत. परंतु अशा मध्यरात्री सुरू होणाऱ्या लोकलचा प्रवास मात्र हा पहिलाच होता.
सकाळी सहानंतर बाजूच्या डब्यातून भजन ऐकू आले. काही वाद्ये वाजवत एका सुरात प्रवासी गात होते. प्रवासाचा आनंद घेत होते. आमच्या गटातील सहप्रवास्यांनीसुद्धा भूपाळ्या आणि अभंग रचनांनी आमची पहाट आनंददायी केलीच होती. पहाटेचा हा प्रवास माझ्या आयुष्यात तरी मला खूप महत्त्वाचा वाटला कारण या प्रवासाने माझ्या लक्षात आले की आपण किती खूप सुखी आहोत! तसे सुखाचे मोजमाप करता येत नाही परंतु आपल्यापेक्षा खडतर आयुष्य जगणारी माणसे पाहिली की आपले आयुष्य किती सुखावह आहे, हे लक्षात येते. आपण जेव्हा अतिशय वाईट मनस्थितीतून जात असतो तेव्हा आपल्याहून वाईट अवस्थेत जगणाऱ्या माणसांची आठवण काढायला पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्यापेक्षा किती सुखी आहोत, हे जाणवते. एका आगळ्यावेगळ्या अनुभवाची शिदोरी बांधून मी गाडीतून उतरले. हा रेल्वे प्रवासाचा अनुभव कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहील. सुखाची व्याख्या बदलून टाकणारा हा प्रवास, माझा पुढील जीवनप्रवास आनंददायी करणारा ठरला, हे मात्र निश्चितच!