कथा- प्रा. देवबा पाटील
त्या दिवशी सायंकाळी जयश्री खेळून घामाघूम होत येताच तिने दोरीवरचा टॉवेल काढला व आपला घाम टॉवेलाने पुसत स्नानगृहात गेली. ‘‘आपले हातपाय व तोंड धुवून ते कोरडे करीत स्वयंपाकघरात आईजवळ गेली व आई, आपणास हा इतका घाम कसा काय येतो ग?’’ असा जयश्रीने प्रश्न विचारला. आई सांगू लागली, ‘‘आपल्या शरीराच्या त्वचेखाली पेशींपासून बनलेल्या घर्मग्रंथी असतात. ह्या घर्मग्रंथी रक्तातील अशुद्ध व टाकाऊ द्रव्ये वेगळे करतात व त्यांच्यापासून घाम बनवितात. हा घाम घर्मग्रंथींमधून सूक्ष्म वलयांकित घर्मनलिकांद्वारे आपल्या त्वचेवर येतो. आपण जेव्हा खेळतो किंवा व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायूंचे जोराने आकुंचन व प्रसरण होते. स्नायूंचे कार्य वाढते. शरीरात नेहमीपेक्षा जास्त उष्णता निर्माण होते. तसेच उन्हाळ्यात बाहेरचे तापमान वाढलेले असते. त्यामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते. शरीरातील ही वाढलेली उष्णता कमी व्हावी व शरीराचे तापमान सामान्यरीत्या कायम राहावे म्हणून शरीरात घाम जास्त तयार होतो.’’
‘‘पण तापातसुद्धा आपणास घाम येतो. तो का येतो मग?’’ जयश्रीने शंका उकरली. ‘‘माणसाला ताप आला म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान वाढते. तसेच माणसाला ताप आला की घामही येतो. त्या घामाची वाफ होण्यासाठी लागणारी उष्णता ही माणसाच्या शरीरातूनच घेतली जाते. त्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान कमी होते व त्याचा ताप उतरतो.’’ आईने सांगितले.
‘‘घाम आल्यावर पंख्याने आपणास गार कसे काय वाटते गं आई?’’ जयश्रीने कुतूहलाने विचारले. ‘‘बाहेरील हवेमुळे ह्या घामाची वाफ होते. घामाच्या बाष्पीभवनासाठी लागणारी उष्णता ही शरीरातूनच घेतली जाते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते व आपणास गार वाटते. हवेच्या झुळकेने वा पंख्याच्या हवेने हे बाष्पीभवन जलद म्हणजे वेगाने होते व आपल्या शरीराला लवकर गारवा मिळतो.’’ आईने सांगितले.
‘‘घामाची चव खारट का लागते?’’ जयश्रीने पुन्हा प्रश्न केला.आई म्हणाली, ‘‘घामात युरिया, मीठ, पाणी व क्षार असतात. मिठामुळे घामाची चवही खारट असते.’’‘‘पण मग हिवाळ्यात घाम कमी येतो व लघवी जास्त येते असे का होते?’’ जयश्रीने शंका काढली.‘‘उन्हाळ्यात घाम जास्त आल्याने साहजिकच लघवी कमी येते; परंतु हिवाळ्यात शरीराला स्वत:चे तापमान कमी करण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे घाम कमी येतो. साहजिकच शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी लघवी जास्त येते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीराचे तापमान कमी होते, तर हिवाळ्यात तापमान कमी असल्याने शरीराची उष्णता वाया जाऊ नये म्हणून घाम येत नाही.’’ आईने जयश्रीच्या शंकेचे समाधान केले.
‘‘का गं आई, हृदयाची धडधड कशी होते?’’ जयश्रीने प्रश्न केला. ‘‘शरीराला होणारा रक्ताचा पुरवठा हा हृदयापासून होतो. हृदयांच्या चारही कप्प्यांमध्ये व त्याला जोडलेल्या महारोहिणीसही (मुख्य रक्तवाहिनी) झडपा असतात. ह्या झडपांची नियमित व तालबद्ध उघडझाप होत रक्ताभिसरणाचे कार्य चालू असते. अशुद्ध रक्त हृदयाकडे व शुद्ध रक्त हृदयापासून शरीराकडे दर मिनिटाला ७२ वेळा फेकले जाते. त्यावेळी ही उघडझाप ज्या नादबद्ध तालात होत असते त्यालाच हृदयाचे किंवा नाडीचे ठोके किंवा हृदयाची धडधड असेही म्हणतात.’’आईने सांगितले.
‘‘आपण काम करताना, खेळताना, श्रम करताना हृदयाची गती का वाढते? छातीत का धडधडते?’’ जयश्रीने विचारले. आई म्हणाली, ‘‘बाळा, हृदयाच्या कार्याची होणारी अवाजवी जाणीव म्हणजेच छातीत धडधडणे. कोणतेही काम करताना, खेळताना, श्रम करताना आपल्या शरीरातील स्नायूंना जास्त प्राणवायूची आवश्यकता असते व ते जास्त कार्बन डायऑक्साईड रक्तात सोडतात. त्यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. शरीरातील मज्जातंतूंद्वारा मेंदूला स्नायू काम करीत असल्याचे कळते; परंतु काही क्रियांमध्ये शरीरातील स्नायूंकडून रक्ताची मागणी जास्त होते. त्या स्नायूंना शुद्ध रक्ताचा पुरेसा पुरवठा व्हावा ह्यासाठी मेंदूतील मज्जा केंद्राकडून हृदयाचा पंप वेगाने चालवल्या जातो. त्यामुळे हृदयक्रिया वाढून हृदयाचे ठोके वेगाने पडतात म्हणजेच हृदयाची गती वाढते व नाडीचे ठोकेही वाढतात अर्थात हृदयाची धडधडही वाढते. कधी कधी मनुष्य जेव्हा घाबरतो तेव्हा त्याच्या छातीत अशीच धडधड वाढते. म्हणून मनुष्याने विनाकारण मनात भीती बाळगू नये व आपल्या हृदयाची धडधड वाढू देऊ नये.’’‘‘नाही आई मी तशी विनाकारण घाबरत नाही.’’जयश्री उत्तरली.