Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजबाप्पा आला रे...

बाप्पा आला रे…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

किती जिव्हाळ्याचा आतून आलेला आवाज…
कारण…. तो येणार असतो ना… गोंडस, गोजिरवाणा, लोभस, लडीवाळ, बाळसेदार, गुटगुटीत…
बाप्पा मोरया रे… तो येण्याच्या किती तरी दिवस आधी ही ओळ ओठांवर गुणगुणते!!
किती तरी दिवस त्याच्या आगमनाची तयारी घराघरांत, मंडळा-मंडळात उत्साहाने सुरू होते… हे करू का… ते करू, असं करू कां तसं करू…. नुसतं उधाण आलं असतं… मनाला व कामाला!!
मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचे हात सुद्धा माती कुरवाळत तुझं सुंदर रूप साकारतात!!
नवीन नवीन आरास डोक्यात धुमाकूळ घालत असते… काय छान दिसेल… कसं छान दिसेल!!
प्रसादाचे मोदक नैवेद्याच्या आधीच जिभेवर उड्या मारायला लागतात व या आठवणीने पोटात कावळ्यांचा दंगा चालू होतो… कधी एकदाच…😋😋

घरदार घासून पुसून स्वच्छ होऊन तोरणासाठी सज्ज, अंगण सारवून बसतं रांगोळीची वाट पहात
कधी ती येते सजून रंगून!!
चौरंग सुद्धा चकचकीत होतो त्या गुटगुटीत बाळाला मांडीत बसवायला!
किती किती तयारी त्या लडीवाळाची, त्याच्या मुक्कामात कशाची कमी पडायला नको याची पूर्ण काळजी घेतली जाते, आईला सोडून दहा दिवस ते आपल्या कडे राहणार असतं ना… बुद्धीची देवता ती… प्रत्येकाची झोळी त्याच्यापुढे पसरलेली!

पावसाने न्हाऊन माखून झालेली फुले त्याच्या गळ्यात विराजमान व्हायला तयार, तर दुर्वा पण फुलांचा हात धरून हजर!
दोन समया चौरंगाच्या दोन बाजूला मंद वाती तेवत झोकात उभ्या!
झालं… झालं… सगळं झालं… आता फक्त आगमन…..
ढोल, ताशे, टाळ… आसमंत दुमदुमुन गेला… मनातला व जगातला!!
आला रे… जल्लोष… बाप्पा मोरया रे…
डोळे दीपले त्याला पाहून…. वर्षातून एकदाच येतोस रे… पण जीव सुखावून जातो… किती करू न किती नको असं होऊन जातं रे तुझ्यासाठी!

कसं आहे न्… देवाचं अन् आपलं नातं… खूप जवळचं… आई इतकंच… म्हणून देवाशी संवाद करताना नेहमी एकेरीच संबोधतो आपण… इतकं एकरूप! त्यालाही ते आवडत असतं असं जीवाभावाचं नातं जुळणं भक्ताशी…!
तो आला… तो बसला….. मोदकाचा आस्वादही घेतला…
मन आनंंदाने नाचू लागलं…
बाप्पा मोरया रे!!! नमो नमो गणराया
तू सदा सिद्धीचा पाया
मंगलमूर्ती अगाध कीर्ती
बाप्पा मोरया रे… बाप्पा मोरया रे…
गणपती बाप्पा मोरया…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -