विशेष – आरती अंकलीकर, सुप्रसिद्ध गायिका
संगीताप्रमाणेच समाज आणि त्यात साजरे होणारे सणही परिवर्तनशील असतात. याचा अनुभव सगळेच घेत आहोत. गणेशोत्सवही याला अपवाद नाही. हा सण नेहमीच आनंद, सुख-सौख्य घेऊन येतो. या काळात होणारी सामाजिक घुसळण अनेक चांगले मापदंड प्रस्थापित करून जाते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती व्हावी आणि नकारात्मकतेची जळमटे झटकून समाज एकसंध करण्याची शक्ती गणेशाने प्रत्येकाला द्यावी.
गणेशाचे आगमन होत आहे. त्याचा आनंद सगळीकडे जाणवतोय. यात आबालवृद्ध सहभागी होतात आणि पर्वणी साधत अनेकानेक उपक्रम राबवतात. या उत्सवाचे, खऱ्या अर्थाने लोकोत्सवाचे बदलते रंग, बदलते ढंग आपण पाहिले आहेत. पूर्वी गणेशोत्वसाचे स्वरूप, रूप वेगळे होते. आता आणखी वेगळे आहे. पण काळ नेहमी पुढेच जात असतो. संगीतासारखेच जीवन परिवर्तनशील असल्याचे सूत्र आपण सगळेच जाणतो आणि मानतो. वेळ बदलते तसे संगीत बदलत असते आणि त्याचप्रमाणे जीवनही कायम बदलताना दिसते. गणेशोत्सवासारख्या सणांच्या निमित्ताने याची तीव्रतेने जाणीव होते.
गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यांसमोर येतो तो सासरी म्हणजेच मुंबईतील आमच्या शास्त्री हॉलमध्ये साजरा होणारा उत्सव. तिथे मंडप घालण्यापासून पुढील प्रत्येक काम सोसायटीतील सदस्यांकडून केले जाते. येथील रहिवासी हा उत्सव अतिशय भक्तिभावाने, पावित्र्य राखत, जुना बाज कायम ठेवून नवतेचे स्वागत करत साजरा करतात. त्यामुळेच हा एक सर्वांगसुंदर सोहळा होऊन जातो. उत्सवासाठी मोठा मांडव घातला जातो. सुंदर स्टेज असते. जाणकार मंडळी दरवर्षी त्याच आनंदाने हे काम करतात. अत्यंत परंपरागत पद्धतीने इथे गणपती बसवला जातो. सजावटही जुना बाज राखणारी आणि वैभव जपणारी असते. एकत्रित प्रयत्नांमध्ये उभ्या राहिलेल्या सुबक आणि सुंदर मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यापासून उत्सवाचा संपूर्ण काळ भारलेला होऊन जातो. पहिल्या दिवशी गणपतीची मंगलमय मूर्ती आणताना ढोलक, लेझिम आणि टाळांचा गजर सुरू असतो. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली इथली मुले-मुली पालखीच्या मागे-पुढे वादन करत गणपतीला मिरवून आणतात. गणरायाचा गजर होतो. गणेशाची मूर्ती अगदी छोटी, जवळपास एक फुटाचीच असते. त्याची सुंदरशी मिरवणूक आमच्या वाडीमध्ये येते तेव्हाची वातावरणनिर्मिती शब्दातीत म्हणावी लागेल. मग पुढचे दहा दिवस अनेक उपक्रम राबवले जातात. अभ्यासू लोक आपली मते मांडतात. चांगल्या वक्त्यांच्या भाषणांचा लाभ घेता येतो. कीर्तन, प्रवचनासारखे कार्यक्रमही होतात. रहिवाशांनी बसवलेले करमणुकीचे कार्यक्रमही होतात, विनोदी नाटकेही होतात आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे वैचारिक, आध्यात्मिक, प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळते. थोडक्यात, असा सुरेख संगम असणारा गणेशोत्सव मला मनापासून भावतो.
यंदा तर गणेशाचे आगमन माझ्यासाठी विशेष आनंददायी आहे. गणेश आगमनाच्या अगदी काही दिवस आधी भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणे, हा मी फार मोठा बहुमान समजते. त्या पुरस्काराने माझ्या जीवनाचा गौरव होत असल्याची भावना आणि महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित झाल्याची बाब आत्यंतिक सुखावणारी आहे. स्वाभाविकच यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी आगळा आहे, असे म्हणता येईल. सामाजिकदृष्ट्या विचार करायचा तर यंदा पावसानेही सगळीकडे चांगली हजेरी लावली आहे. पाण्याची चिंता दूर झाली आहे. साहजिकच या सुजलाम सुफलाम वातावरणाचा सकारात्मक प्रभावही यंदाच्या सण पर्वांवर दिसून येत आहे. अर्थात पुरामुळे जागोजागी झालेले नुकसानही विसरून चालणार नाही. पुराचा फटका बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपण पाहिले आहेत. त्यामुळेच पुढल्या वर्षी कोणावरही अशी वेळ येऊ नये, अशी मनोकामना व्यक्त करतच आपण गणेशाचे स्वागत करायला हवे.
अलीकडेच कोलकाता आणि बदलापूरमधील घटनांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करून गेल्या. यानिमित्ताने एकत्र आलेला समाज आणि जागृत झालेल्या सामाजिक जाणिवांची अनुभूती आपण घेतली. या घटनांनी प्रत्येकजण हेलावून गेलेला दिसला. या समाजाचा भाग असल्याबद्दल खेद वाटावा, अशीही भावना काहींमध्ये दिसली. साहजिकच यंदाच्या गणेशोत्सवावरही या घटनांचा प्रभाव असणार आहे. विशेषत: या सणाचे औचित्य साधत समाजसुधारणेतील आपली जबाबदारी ओळखण्याची आणि ती पार पाडण्याची वेळ प्रत्येकाने ओळखायला हवी. कारण आज प्रत्येकाला त्यासाठी काही ना काही करायचे आहे. आवाज उठवायचा आहे. अन्यायाला वाचा फोडायची आहे. पण एकट्या-दुकट्या माणसाकडे हे धैर्य, एवढा वेळ, एवढी शक्ती असतेच असे नाही. मात्र आता काही काळासाठी का होईना, आपण एकत्र येतोय. चर्चा घडणार आहे. या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. या कामी गणेशाने आपल्याला सामर्थ्य द्यावे, हे माझे त्याच्याकडे आवाहन असेल.
आता स्त्री सशक्त झाली आहे. पण या सशक्त स्त्रीला कसे स्वीकारावे, तिला कसे सन्मानित करावे, तिचे उंचावलेले स्थान कसे जपावे हे आजही अनेकांना समजलेले दिसत नाही. पुरुषी वर्चस्वाखाली, नको त्या दंभाखाली ते आजही तिचे स्थान नाकारतात. तिला कह्यात ठेवू इच्छितात. त्या दृष्टीने आपल्या मुलांना, नातवंडांना काय शिकवावे, याचाही विचार या उत्सवानिमित्ताने व्हायला हवा. कारण सध्याची स्थिती, घटना प्रत्येकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. सतत दुसऱ्यांकडे बोटे दाखवून आता चालणार नाही. परिस्थिती बदलायची तर तुम्ही-आम्ही, प्रत्येक घराने स्त्रीसन्मानाची पताका फडकवत ठेवणे गरजेचे आहे आणि प्रथमपासून प्रबोधनाचे काम करणारा गणेशोत्सव ही संधी प्रत्येकाला नक्कीच देईल. या अर्थानेही मला हा गणेशोत्सव महत्त्वाचा वाटतो.
हा संपूर्ण काळ आर्थिक उलाढालीचा असतो. या काळात अनेक व्यावसायिकांना, कारागिरांना, व्यापाऱ्यांना पैसे मिळतात. त्यांच्या व्यवहारांना चालना मिळते. मुख्य म्हणजे या सगळ्यांमुळे बाजारात पैसा फिरतो. स्वाभाविकच असा उत्सव अनेकांची पोटे भरण्यास, त्यांच्या हाताला काम देण्यास कारक ठरतो. उत्सवाच्या जमेची ही बाजूही सध्या प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र एकीकडे असे असले तरी या सगळ्यात, वाढत्या बाजारूपणाच्या लाटेत आपली संस्कृती जपणेही मला तितकेच महत्त्वाचे वाटते. पैसा मिळवायला, व्यापार फुलवायला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही, मात्र आता प्रत्येक माणसाने थोडे थांबून आज समाजाला कशाची गरज आहे, हे पाहावे असे वाटते. अगदी राजकारण्यांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांनीच एक क्षण तरी याचा विचार करावा आणि आपण करतो त्या कामातून समाजाला काय मिळणार आहे, याचे अवलोकन करावे. प्रत्येकाने नियुक्त केलेले काम या जाणिवेनिशी, विचारानिशी पार पाडले आणि पूर्ण क्षमतेने, पारदर्शकतेने, सचोटीने आणि संवेदनशीलतेने पूर्ण केले तरी समाजातील नकारात्मक चित्र बदलण्यास फार वेळ लागणार नाही, असे वाटते. प्रत्येकाने सर्वतोपरी उत्तम देण्याचा विचार केला तर सर्व प्रकारची कीड बघता बघता संपून जाईल. यंदा गणेशाने आपल्याला ही सम्यक दृष्टी द्यावी कारण समाज खालपासून सुधारण्याची मोठी गरज आता निर्माण झाली आहे.
सध्या मन चाळवणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात आणि प्रत्येकाच्या आवाक्यात आहेत. त्यावर काहीही निर्बंध नाहीत. त्यासाठी काही पावले उचलण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त करावीशी लागते. यासाठी सरकारकडूनही पावले उचलली जावीत आणि पालकांनीही योग्य ते संस्कार करत मुलांना यापासून दूर ठेवावे. आपल्या पाल्यालाच नव्हे तर सजग आणि सुजाण माणसाने आपल्या संपर्कात येणाऱ्या असमंजस माणसाला हे धडे देण्याची, संस्कारित करण्याची गरज आता ओळखायला हवी. कारण आज अनेकांची नैतिक मूल्ये हरपली आहेत. आपण काय करतो याचे भान हरपले आहे. त्यामुळेच ते परत एकदा रुजवण्याची गरज आहे. गणेशोत्सव त्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. शेवटी ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळेच यंदा आपण त्याच्याकडे समाजाला चांगली बुद्धी देण्याचे वरदान मागू शकतो. प्रत्येक मतदार योग्य उमेदवारावाला मत देण्याची शक्ती त्याच्याकडे मागू शकतो. केवळ बढाया मारणारे लोक आता समाजाला नको आहेत, हे त्याला विनवू शकतो. मुख्य म्हणजे वाढता बाजारुपणा कमी करण्यासाठी कार्यरत होण्याचा निर्धार आपण सगळेच करू शकतो. आज चालते तीच बातमी दिली जाते, छापली जाते आणि पुन्हा पुन्हा दाखवली जाते. पण या सगळ्यात सच्चेपणा आणि इमानाचा बळीही जाऊ शकतो. म्हणूनच रंजकतेचा अट्टहास, दुराग्रह आता तरी दूर होणे गरजेचे आहे. विकते आहे म्हणून नव्हे तर चांगले आहे म्हणून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तरच आपल्याला अपेक्षित आदर्श आणि खऱ्या अर्थाने प्रगत समाज निर्माण होईल. त्यामुळे गणरायाने आपल्या या सगळ्या भावनांचा विचार करावा आणि समाजाला हे दान देण्यासाठी शक्ती द्यावी हीच कामना.