Sunday, July 6, 2025

बैठ्या खेळांची रंगत : कविता आणि काव्यकोडी

बैठ्या खेळांची रंगत : कविता आणि काव्यकोडी
खेळ म्हटलं की घरात
आनंद वाहतो ओसंडून
बैठे खेळ खेळतो आम्ही
तहानभूक विसरून

पत्त्यांचा खेळ मेंढीकोट
रमी, ब्रिज, गुलामचोर
भिकार-सावकार खेळसुद्धा
घरात खेळतात लहानथोर

कॅरम खेळताना घरात
चुरस लागते जिंकायची
स्ट्रायकरने क्वीन काढण्यात
चढाओढ असते साऱ्यांची

बुद्धिबळ खेळात जो तो
शत्रूवर उलटवतो डाव
प्याद्यांची चाल ओळखणे
सोपे नसते राव

सापशिडीच्या खेळात
शिडी आली की चढतो
सापाने गिळले तर
दणकन खाली आदळतो

सारीपाट या खेळात
साधतो आम्ही ताळमेळ
पदरी दान पडल्याशिवाय
सुरू होतच नाही खेळ

सारेच बैठे खेळ खेळतो
मजेत आम्ही सारे जण
जागा, वेळ, वय, खर्चाची
नसते खेळात अडचण

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) भाजून, वाफवून
उपवासाला खातात
रेताड जमिनीत
जास्त करून येतात

लाल आणि पांढरी
असतात ही राव
हे एक कंदमूळ
त्याचं काय नाव?

२) उसाचा रस
आटवता खूप
ढेपेसारखे
तो घेई रूप

खनिज, क्षार
पोटात ठेवतो
साऱ्यांशी कोण
गोडीने बोलतो?

३) काळी मृदा नि
उबदार हवामान
मध्यम पाऊस
मानवतो छान

कापड उद्योगास
कच्चा माल पुरवी
कोणते हे पीक
प्रमुख व्यापारी?

उत्तर -


१) रताळे
२) गूळ
३) कापूस
Comments
Add Comment