अलीकडच्या काही घटना समाजमन ढवळून काढणाऱ्या होत्या. तो दाह अजूनही जाणवतो आहे. गौरी, गणपती, नवरात्री आदी उत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या या समाजातील वाढती विकृती अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत आहे. त्याविरुद्धचा जागर, लढा एक-दोन दिवस मेणबत्त्या पेटवून संपणार नाही. सणांच्या निमित्ताने अशा शक्तीविरुद्ध एकवटण्याचे प्रयत्न करता येतील. थोडक्यात, हा उत्सव साऱ्यांसाठी आनंददायी आणि समाधान देणारा असावा, या दृष्टीने आता प्रयत्न होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. सर्व विघ्ने दूर व्हावीत, गणेशोत्सवाचा हाच तर खरा उद्देश आहे. लोकांनी स्वत: आनंद घ्यावा, इतरांना द्यावा, हेच विघ्नहर्त्याचेही म्हणणे असावे.
विशेष – स्वाती पेशवे
आज विघ्नहर्त्याचे आगमन झाले आहे.एकीकडे त्याच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसरीकडे या उत्सवकाळात सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार व्हायला हवा. सध्या हा देखील सणाच्या साजरीकरणाचा एक भाग असण्याची गरज आहे. ते साधले तर नानाविध सामाजिक प्रश्नांचे तिढे वाढत असताना समाजाला एकत्रित करणाऱ्या या वातावरणाचा यशोचित परिणाम बघायला मिळेल.
घरोघरी उत्सवाच्या महापर्वाची सज्जता सुरू असल्यामुळे भारलेले वातावरण अनुभवायला मिळत आहे. सण आणि उत्सव साजरे करताना आपण संस्कृती, परंपरेचा प्रवाह पुढे नेत असतोच, खेरीज काळानुरूप त्यात आवश्यक ते विचारप्रवाह प्रभावी आणि परिणामकारक करण्याचे कामही आपसूकच होत असते. त्यामुळेच वरकरणी या गोष्टी सालाबादप्रमाणे येणाऱ्या, नैमित्तिक वाटत असल्या तरी प्रत्येक वर्षीचा सण वेगळा असतो आणि तो काही तरी नवीन वैचारिक ठेवा देऊन जात असतो. नवीन पिढीचे संस्करण हा त्यातील एक भाग आहेच, त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांप्रती सार्वत्रिक समज वाढवण्याचे हे एक अतिशय प्रभावी माध्यमही आहे. हे जाणूनच लोकमान्यांनी इंग्रजी जुलूम आणि गुलामगिरीविरोधात जनमत संघटित करण्यासाठी गणेशोत्सव सार्वत्रिक केला. या प्रयत्नाने एका जनलढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपण पाहिली. आज आपण स्वतंत्र आहोत. जगामध्ये एक ओळख राखून आहोत. आता तर जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. मात्र समाजभावना जाज्वल्य ठेवण्यासाठी, चुकीच्या पायंड्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, अयोग्य गोष्टींविरोधात एकत्रितपणे उभे राहण्यासाठी आजही सण-उत्सवांचे महत्त्व पूर्वीइतकेच आहे, हे विसरता कामा नये. सण आणि सामाजिक जाणिवा हे समीकरण प्रत्येक साजरीकरणावेळी स्मरणात राहायलाच हवे. यंदाच्या येऊ घातलेल्या गणेशोत्सव आणि अन्य सणश्रृंखलेच्या निमित्ताने हे विसरता कामा नये.
तसे पाहायला गेल्यास आज प्रत्येक दिवस सणासारखा साजरा करण्याची नवप्रथा एका वर्गामध्ये बघायला मिळते आहे. ‘आहे रे’ वर्गाचा प्रत्येक वीकएंड या सदरात मोडू शकतो. मात्र वैयक्तिक सुखे आणि एकत्र येऊन अनुभवण्याजोगी सुखे आणि त्यातून वृद्धिंगत होणाऱ्या सामाजिक जाणिवा हे दोन पूर्णपणे भिन्न पण लक्षात घेण्याजोगे विषय आहेत. म्हणूनच यंदाच्या उत्सवाची तयारी करताना निखळ आनंद मिळवण्याबरोबर हा सामाजिक आशय आणि पदरही ध्यानी ठेवायला हवा. विशेषत: आजचे आपले पारतंत्र्य, दास्य, एकटेपण, प्रश्न, समस्या, सामंजस्य वेगवेगळ्या पातळीवर उग्र रूप धारण करत असताना, या प्रश्नांचे स्वरूप बदलत असताना परिस्थितीला तोंड फोडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, मंथन करण्यासाठी समाज एकत्रित आणणाऱ्या या सणांसारखे दुसरे एखादे योग्य व्यासपीठ आहे, असे वाटत नाही. म्हणूनच गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार करायला हवा. गणेशोत्सवातून कलागुणांना वाव मिळावा, नेतृत्वगुण जोपासले जावे हा विचार काही आजचा नाही. तो फार पूर्वीपासूनचा आहे. अलीकडे नेतृत्वाची संधी म्हणूनही या उत्सवाकडे पाहिले जात आहे. मात्र सध्या गणेशोत्सवामध्ये सामाजिक संस्था, संघटनांच्या सहभागाऐवजी राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग वाढत आहे. आपल्या प्रसिद्धीची, जनतेपर्यंत जाण्याची आयती संधी म्हणून या उत्सवाकडे पाहिले जात आहे. आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने हा उत्सव अधिक धामधुमीत साजरा करण्यावर भर दिला जाणार हेही उघड आहे. गणेशोत्सव मंडळे असोत वा नेते मंडळी असोत, दोन्हींकडेही संधी साधणे हा समान गुण दिसून येतो, तो आताही दिसेलच.
काही वर्षांपूर्वी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यावर भर देण्यात आला होता; परंतु ती म्हणावी तशी अस्तित्वात येऊ शकली नाही. याचे प्रमुख कारण नेतृत्वासाठी सुरू असणारी स्पर्धा हेच आहे. आज शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक तसेच सामान्य जनता हैराण आहे. अशा परिस्थितीत रस्त्यात रहदारीला अडथळा येईल, अशा पद्धतीने उभारण्यात आलेले गणेशोत्सवाचे मंडप भर घालतात. अशा मंडपांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडून जनतेला काय त्रास सहन करावा लागतो याची कल्पनाच केलेली बरी. याचा विचार करता हा उत्सव रस्त्यांवर साजरा होणार नाही, यासाठी प्रयत्न गरजेचे आहे; परंतु ते करायचे कोणी आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणार का, हाही प्रश्नच आहे. कारण या काळात कायदा आणि सुव्यवस्था मोडीत आणण्याचाच चंग अनेक कार्यकर्त्यांनी बांधल्याचे दिसते. त्यामुळे स्पीकर्सचा आवाज, मिरवणुकांच्या वेळा, कार्यक्रमांच्या वेळा याबाबतचे कोणतेही नियम किंवा त्या संदर्भातील पोलिसांच्या, न्यायालयांच्या सूचनांचा विचार केला जात नाही. अशा पद्धतीने जनतेला त्रास देऊ शकणारे विघ्न आणून विघ्नहर्त्याचा उत्सव साजरा करणे कितपत योग्य ठरते याचा विचार व्हायला हवा.
गणेशोत्सव काळात वर्गणी जमा करणे काही ठिकाणी जणू खंडणी जमा करण्याचाच प्रकार ठरतो. वास्तविक, वर्गणी ऐच्छिक असावी. ती देणाऱ्याला मनापासून समाधान वाटावे; तरच त्या उत्सवाला काही अर्थ राहतो; परंतु हेही समजून कोण घेणार? कारण गणेशोत्सवात अधिकाधिक खर्च करण्याबाबतही विविध मंडळांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. यंदा हेही चित्र बदलले तर बरे होईल. तसे झाल्यास जनतेचा या उत्सवातील सहभाग वाढेल आणि हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव ठरेल. अलीकडे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीही अधिकाधिक उंचीच्या, भव्य असतील यावर भर दिला जात आहे. मूर्ती अधिक उंचीची असेल तरच गणेशोत्सवाला अर्थ आहे असाच जणू समज आढळतो; परंतु अशा मूर्तींसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. मिरवणुकीपासून विसर्जनापर्यंत अनेक प्रकारचा त्रास समोर येतो. त्यामुळे गणेशमूर्तींचा आकार आटोपशीर असेल याकडे सर्वच गणेश मंडळांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोणताही धार्मिक उत्सव हा त्याच भावनेने आणि श्रद्धेने साजरा व्हायला हवा; परंतु गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणाऱ्यांचा धार्मिक भावनांशी आणि श्रद्धेशी काय संबंध, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे या उत्सवामध्ये धार्मिक भावना जोपासली जावी, तो श्रद्धेने साजरा करावा, यासाठी नव्याने प्रबोधनाची आवश्यकता आहे. अर्थात या साऱ्या परिस्थितीतही काही आशेचे किरण आहेत. काही मंडळे कोणताही डामडौल न करता साधेपणाने; परंतु श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करत आहेत. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजाविषयीची जाणीव प्रकट होत आहे; परंतु अशी मोजकीच उदाहरणे पाहायला मिळत आहेत. अशा मंडळांची संख्या वाढणे किंवा इतरांनी त्यांचे अनुकरण करण्याची खरी आवश्यकता आहे. शेवटी संपूर्ण समाज एकत्र यावा, त्यात एकसंधता राहावी यासाठी सांस्कृतिक धाग्याचा वापर करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, याचे स्मरण आपण ठेवायला हवे.
हल्ली गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्याने या बाबी अभावानेच पाहायला मिळत आहेत. त्याऐवजी डॉल्बीचा वापर वाढत आहे; परंतु जोरजोरात वाजणाऱ्या आणि कानाचे पडदे दुखावू शकणाऱ्या डॉल्बीच्या गंभीर दुष्परिणामांचा विचार व्हायला हवा. खरे तर डॉल्बीऐवजी कमी आवाजातील स्पीकर, त्यावर वाजणारे सनईचे सूर तसेच भक्तिगीते वा भावगीते यातून गणेशोत्सवाचा खरा आनंद प्राप्त होणार आहे. पूर्वी गणेशोत्सव काळात मेळे व्हायचे. त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत, त्यातून उपजत कला-गुणांना वाव मिळायचा. आताही ती संधी मिळवून देणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे मोठ्या संख्येने समाज एकत्रित येत असल्याने सामाजिक स्वास्थ्य, सलोखा, बंधुता आदी हरपत चाललेली गुणवैशिष्ट्ये वाढवण्यासाठी त्याचा वापर करून घेण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. अलीकडच्या काही घटना समाजमन ढवळून काढणाऱ्या होत्या. तो दाह अजूनही जाणवतो आहे. गौरी, गणपती, नवरात्री आदी उत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या या समाजातील वाढती विकृती अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत आहे. त्याविरुद्धचा जागर, लढा एक-दोन दिवस मेणबत्त्या पेटवून संपणार नाही. सणांच्या निमित्ताने अशा शक्तीविरुद्ध एकवटण्याचे प्रयत्न करता येतील. थोडक्यात, हा उत्सव साऱ्यांसाठी आनंददायी आणि समाधान देणारा असावा, या दृष्टीने आता प्रयत्न होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. गणेशोत्सवाचा हाच तर खरा उद्देश आहे. लोकांनी स्वत: आनंद घ्यावा, इतरांना द्यावा, हेच विघ्नहर्त्याचेही म्हणणे असावे. तेव्हा त्याच्या उपासकांनी, भक्तांनी, साधकांनी या विचारातून यंदाच्या उत्सवात रंग भरावेत आणि आपल्यावरीलच नव्हे तर त्याच्या साक्षीने संपूर्ण समाजावर येऊ घातलेल्या विघ्नांचा नाश करावा, हे उत्तम. (अद्वैत फीचर्स)