मुंबई : लोअर परेलमधील कमला मिल कंपाउंड परिसरातील टाईम्स टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईतील हे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईत सर्व ठिकाणी गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मात्र अशातच मुंबईतील कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या मदतनीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र मुंबईत सततच्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील सवेरा या रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सवेरा इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील डकला आग लागली. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी मुंबई पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या इमारतीला आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.