Monday, May 19, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Kamala Mills Fire : अग्नितांडव! मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग

Kamala Mills Fire : अग्नितांडव! मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग

परिसरात धुराचे लोट; आगीचे कारण अस्पष्ट


मुंबई : काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लोअर परेल येथील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरवरील एका मजल्याला अचानक आग लागली. काही क्षणातच मोठा भडका उडाल्यामुळे या आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्णरित्या ही काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये सर्व मजल्यांपर्यंत गेला. त्यानंतर धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आल्या.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आणखी तीन गाड्या मागवण्यात आल्या. शर्थिच्या प्रयत्नानंतर टाईम्स टॉवरला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment