गणेशोत्सव म्हटलं की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबाग-परळ मधल्या लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) या गणपतीची. लालबागचा राजा गणपतीची मूर्ती, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सर्व काही मन मोहून टाकणारा नजारा असतो. यंदाचं या मंडळाचं हे ९१ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. लालबागचा राजाची पहिली झलक गुरुवारी सर्वाना पाहायला मिळाली. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे.
मयूरासनावर विराजमान लालबागचा राजा
लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) यंदा मयूरासनावर विराजमान आहे. राजाची एक झलक पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजाचा विजय असो … मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचं दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना मिळालं. लालबागचा राजाचं रुप साठवण्यासाठीही आपल्या मोबाईलमध्ये मंडळाच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा ( Lalbaugcha Raja ) मुकूट हा सोन्याचा आहे. देशातील श्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे हा मुकूट अर्पण केला आहे अशी चर्चा आहे.
नवसाला पावणारा राजा अशी ख्याती
लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) हा नवसाला पावणारा अशी लालबागच्या या गणपतीची ख्याती आहे. राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी, राजकारणी, देश-विदेशातले व्हीव्हीआयपीही दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुकेश अंबानी यांचीही सहकुटुंब उपस्थिती दर्शनाला असते. या वर्षी अनंत आणि राधिका यांचं लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला. यानंतर लालबागचा राजा कार्यकारिणी मंडळाच्या विश्वस्त पदावर अनंत अंबानींची नियुक्ती करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट अशी भेट दिली आहे.
२० किलो सोन्याचा मुकूट अर्पण किंमत किती?
यंदा लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं आहे. तर, काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा सुंदर असा देखावा साकारण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिली आहे. या मुकुटाचं वजन २० किलो इतकं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये अशी आहे. कारागीरांना हा मुकूट बनवण्याकरता दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.