PM Modi : अनेक सिंगापूर भारतात निर्माण करण्याची इच्छा; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिंगापूरच्या विकासाची प्रशंसा

  82

सिंगापूर : सिंगापूर हे विकसनशील देशाचे आदर्श उदाहरण आहे. असे अनेक ‘सिंगापूर’ भारतातच तयार करण्याची आमची इच्छा आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिंगापूरमधील विकासाचे कौतुक केले. सिंगापूर हा देश केवळ आमचा भागीदार देश नसून प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणास्रोत आहे, असेही मोदी म्हणाले.


सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या मोदींनी शुक्रवारी या देशाचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. वोंग यांच्याकडे या वर्षी मे महिन्यात सिंगापूरचे नेतृत्व आल्यापासूनची त्यांच्यातील ही पहिलीच भेट होती.


वोंग हे पीपल्स ॲक्शन पार्टीचे नेते असून सिंगापूरचे नेतृत्व करणारी पक्षनेते म्हणून त्यांची चौथी पिढी आहे. त्यांच्याबरोबरील भेटीनंतर मोदी म्हणाले,‘‘सिंगापूरने करून दाखविलेला विकास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हा देश भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचाही महत्त्वाचा भाग आहे.


भारत आणि सिंगापूर हे महत्त्वाचे भागीदार देश असून दोन्ही देशांमधील व्यापार मागील दहा वर्षांत दुपटीने वाढला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार १५० अब्ज डॉलरवर पोहोचला असून भारताने सिंगापूरमध्येच सर्वप्रथम यूपीआय पेमेंट सुविधा सुरू केली होती. कौशल्य विकास ते संरक्षण क्षेत्र अशी विविध क्षेत्रांत आमची भागीदारी वाढली आहे.


दोन्ही देशांमधील संबंध सर्वसमावेश धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेत असल्याचेही मोदींनी जाहीर केले. सिंगापूरच्या विकासाचे कौतुक करताना, भारतातही असे अनेक ‘सिंगापूर’ तयार करण्याची आमची इच्छा असून या उद्दिष्टाकडे आमची वाटचालही सुरू आहे, असेही मोदींनी सांगितले.



सिंगापूरच्या अध्यक्षांबरोबरही चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांचीही भेट घेतली. या दोघांमध्ये कौशल्य विकास, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, संशोधन आणि दळणवळण या क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली. षण्मुगरत्नम हे भारतीय वंशाचे नेते असून ते अर्थतज्ज्ञ आहेत. मोदी यांनी सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली सेन लुंग यांचीही भेट घेत भारत-सिंगापूर संबंधात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. लुंग यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.



सेमिकंडक्टर क्लस्टरसाठी सिंगापूर करणार मदत


भारत आणि सिंगापूरदरम्यान डिजिटल तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर, आरोग्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी सामंजस्य करार झाले. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील कराराद्वारे दोन्ही देश सायबर सुरक्षा, फाइव्ह-जी यांच्यासह सुपर कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करणार आहेत. भारतात सेमिकंडक्टर क्लस्टर निर्माण करण्यासाठीही सिंगापूर मदत करणार असून गुंतवणूकही करणार आहे.

Comments
Add Comment

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक