Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीPM Modi : अनेक सिंगापूर भारतात निर्माण करण्याची इच्छा; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिंगापूरच्या...

PM Modi : अनेक सिंगापूर भारतात निर्माण करण्याची इच्छा; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिंगापूरच्या विकासाची प्रशंसा

सिंगापूर : सिंगापूर हे विकसनशील देशाचे आदर्श उदाहरण आहे. असे अनेक ‘सिंगापूर’ भारतातच तयार करण्याची आमची इच्छा आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिंगापूरमधील विकासाचे कौतुक केले. सिंगापूर हा देश केवळ आमचा भागीदार देश नसून प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणास्रोत आहे, असेही मोदी म्हणाले.

सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या मोदींनी शुक्रवारी या देशाचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. वोंग यांच्याकडे या वर्षी मे महिन्यात सिंगापूरचे नेतृत्व आल्यापासूनची त्यांच्यातील ही पहिलीच भेट होती.

वोंग हे पीपल्स ॲक्शन पार्टीचे नेते असून सिंगापूरचे नेतृत्व करणारी पक्षनेते म्हणून त्यांची चौथी पिढी आहे. त्यांच्याबरोबरील भेटीनंतर मोदी म्हणाले,‘‘सिंगापूरने करून दाखविलेला विकास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हा देश भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचाही महत्त्वाचा भाग आहे.

भारत आणि सिंगापूर हे महत्त्वाचे भागीदार देश असून दोन्ही देशांमधील व्यापार मागील दहा वर्षांत दुपटीने वाढला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार १५० अब्ज डॉलरवर पोहोचला असून भारताने सिंगापूरमध्येच सर्वप्रथम यूपीआय पेमेंट सुविधा सुरू केली होती. कौशल्य विकास ते संरक्षण क्षेत्र अशी विविध क्षेत्रांत आमची भागीदारी वाढली आहे.

दोन्ही देशांमधील संबंध सर्वसमावेश धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेत असल्याचेही मोदींनी जाहीर केले. सिंगापूरच्या विकासाचे कौतुक करताना, भारतातही असे अनेक ‘सिंगापूर’ तयार करण्याची आमची इच्छा असून या उद्दिष्टाकडे आमची वाटचालही सुरू आहे, असेही मोदींनी सांगितले.

सिंगापूरच्या अध्यक्षांबरोबरही चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांचीही भेट घेतली. या दोघांमध्ये कौशल्य विकास, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, संशोधन आणि दळणवळण या क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली. षण्मुगरत्नम हे भारतीय वंशाचे नेते असून ते अर्थतज्ज्ञ आहेत. मोदी यांनी सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली सेन लुंग यांचीही भेट घेत भारत-सिंगापूर संबंधात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. लुंग यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.

सेमिकंडक्टर क्लस्टरसाठी सिंगापूर करणार मदत

भारत आणि सिंगापूरदरम्यान डिजिटल तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर, आरोग्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी सामंजस्य करार झाले. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील कराराद्वारे दोन्ही देश सायबर सुरक्षा, फाइव्ह-जी यांच्यासह सुपर कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करणार आहेत. भारतात सेमिकंडक्टर क्लस्टर निर्माण करण्यासाठीही सिंगापूर मदत करणार असून गुंतवणूकही करणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -