Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

लोकसभा पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर

लोकसभा पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर

जम्बो टीम तयार, नितीन गडकरींकडे महत्त्वाची जबाबदारी; फडणवीस, बावनकुळे, दानवेंकडेही विशेष मोहीम



चार जणांकडे प्रचाराचे नेतृत्व; १७ स्टार प्रचारकांची यादी तयार


मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जम्बो टीम तयार केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विशेष स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींकडे विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.


लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर भाजपाने विधानसभेसाठी चार जणांकडे प्रचाराचे नेतृत्त्व दिले आहे. नितीन गडकरींकडे विशेष प्रचारकपद देण्यात आले आहे. ते महिनाभर राज्य पालथे घालतील. विविध भागांत जाऊन पक्षाचा प्रचार करतील. निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय प्रचाराचे नेतृत्त्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल. गडकरी, फडणवीस, दानवे, बावनकुळे या चार नेत्यांकडे भाजपाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.



स्टार प्रचारकांमध्ये राजकीय रथी-महारथींचा समावेश


भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात १७ जणांचा समावेश आहे. यातील काही जण काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन महाजन, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रविण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.



विदर्भातील ६२ जागांवर भाजपाचे विशेष लक्ष


प्रचाराचे नेतृत्त्व चौघांकडे सोपवणाऱ्या भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीत १७ जणांना स्थान दिले आहे. एकूण २१ नेत्यांवर भाजपाने विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यात बसला. विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी केवळ २ जागा भाजपला जिंकता आल्या. फडणवीस, गडकरी, बावनकुळे विदर्भातून येतात. तिथे विधानसभेच्या ६२ जागा येतात. त्यामुळे भाजपाने विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. विदर्भासाठी मध्य प्रदेशमधील ४ नेत्यांना सक्रिय करण्यात आले आहे. लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपला २९ पैकी २९ पैकी जागा मिळवून देणाऱ्या चार नेत्यांकडे भाजपाने विदर्भाची जबाबदारी दिली आहे.

Comments
Add Comment