जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
नामस्मरण कसेही केले तरीही ते फळते हे खरे आहे, मात्र या प्रवासात जर कुणीतरी मार्गदर्शन करणारे मिळाले तर तुमची प्रगती लवकर होईल. तुकाराम महाराजांना देहधारी सद्गुरू नव्हते, पण त्यांनी जे नामस्मरण केले त्याला तोड नाही, त्यातूनच त्यांना साक्षात्कार झाला. रामकृष्ण परमहंसांनाही देहधारी सद्गुरू नव्हते. मी हे या आधीही खूप वेळा सांगितले आहे, परत सांगतो. तुकाराम महाराज, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, समर्थ रामदास स्वामी यांना देहधारी सद्गुरू नव्हते. हा असा विचार केला की, हाही विचार केला पाहिजे की, तुम्ही त्यांच्यासारखे आहेत का? बरोबरी करताना आपण कोणाची बरोबरी करू शकतो, हा ही विचार मनात यायला पाहिजे. ही सगळी मंडळी खूप थोर होती. आपल्यासारख्या लोकांना तर त्यांच्या पायाच्या नखाचीही सर नाही. तुम्ही म्हणाल आम्ही ठरवले तर आम्ही पण करू ह्यांच्यासारखे नामस्मरण. होईल शक्य? समर्थ रामदास स्वामींनी किती नामस्मरण केले तेही पाण्यात उभे राहून. रामकृष्ण परमहंसांनी किती तरी तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. ह्यांच्याशी बरोबरी कशी साधायची? रामकृष्ण परमहंस पैशांना हातही लावत नव्हते. त्यांच्याकडे एवढी विरक्ती होती. तुम्ही सांगा हे तुम्हाला जमेल का? तुम्ही व ते सारखे का?
एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांची परीक्षा पहिली. रामकृष्ण परमहंस गाढ झोपेत होते. रात्री अडीच तीनची वेळ, अत्यंत गाढ झोपेची. ह्याच वेळेला बहुतेक चोऱ्या होतात. रामकृष्ण परमहंस गाढ झोपेत, दोन्ही हात उघडे ठेवून झोपले होते. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या हातावर रुपयाचे नाणे ठेवले. मात्र झोपेतही त्यांचा हात पालथा झाला व ते पैसे खाली पडले. आता तुम्ही स्वतःचा विचार करा. एखादा सामान्य माणूस गाढ झोपेत असताना कोणीतरी त्याच्या हातात पैसे ठेवले तर? गाढ झोपेत असूनही त्याच्या हाताच्या मुठी बंद होतील व तो हात खिशाकडे जाईल. कुठे ते रामकृष्ण परमहंस व कुठे हे डोमकावळे? ह्यांत कुठे तुलना आहे का? म्हणून अशी बरोबरी करायला जाऊ नये.
सांगायचा मुद्दा हा की म्हणूनच कोणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे. साधा प्रवास करतानाही कोणीतरी मार्गदर्शक लागतो. नाहीतर वेळेत मुक्कामाला पोहोचता येणार नाही. मुंबईमध्ये सातरस्ता म्हणून ठिकाण आहे, जिथे सात रस्ते आहेत. बाहेरचा माणूसच काय, मुंबईतल्या माणसालाही तिथे कुठे जायचे हे पटकन कळणार नाही. एका बाजूने भलतीच वस्ती लागते, दुसऱ्या बाजूने भेंडीबाजार लागतो. अशा ठिकाणी मार्गदर्शक नसेल तर माणूस भरकटत जाईल, मात्र मार्गदर्शक असेल तर माणूस अचूक मुक्कामाला पोहोचतो. आता जिथे दिसणाऱ्या रस्त्यावर मार्गदर्शक नसल्यास ही अवस्था होत असेल तर अव्यक्ताच्या प्रांतात मार्गदर्शक किती गरजेचा आहे हे लोकांना कळायला हवे, मात्र ते उमगत नाही. गुरू कशाला पाहिजे असे म्हणतात.
मी एकाला विचारले, गुरू कशाला पाहिजे हे म्हणतोस, तू लहानाचा मोठा जो झालास ते गुरूशिवाय? उपजत ज्ञानी होतास का? शाळा, महाविद्यालयात गुरूशिवाय शिकलास? वडिलांनी मार्गदर्शन केले असेलच ना? पावलोपावली गुरूंची गरज लागतेच. सांगायचा मुद्दा, “सद्गुरूवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी “सद्गुरू हाच खरा देव, कारण ते खरा देव दाखवतात, ते ज्ञान देतात आणि मार्गदर्शन करतात.