मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) काही तास उरले असताना बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) वाहनांच्या मोठ्या रांगा (Traffic Jam) लागल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या आणखी डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या महामार्गावर वाहनांच्या ६ ते ७ किमीपर्यंत रांगा लागल्या असून साधारण एक ते दिड तासापर्यंत वाहने जागीच ठप्प असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून, पोलीस यंत्रणेकडून ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसे आणखी चाकरमानी गावाची वाट धरतीलही, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.