ऋतुराज – ऋतुजा केळकर
सकाळी सकाळी दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या आगमनाच्या आधी कुंभार आळीत गणपतीच्या विविध मूर्त्या पाहायला मी निघाले. तशी तर सुरेख आरास करून प्राणप्रतिष्ठा केलेल्या गजाननाच्या मूर्त्या सुंदरच दिसतात पण, कुठलीही आणि त्यातल्या त्यात गजाननाची मूर्ती घडत असताना ती डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखं सुख नाही. अगदी लहानपणापासूनच मूर्त्या घडत असताना त्यांचे निरीक्षण करण्याची सवय मला लावली ती उदयदादाने. गिरगावात म्हणजे माझ्या आजीच्या चाळीत म्हणजे खडीवाले वैद्य यांच्या चाळीत कलगुटकर यांचा गणपतीचा कारखाना आहे. आजही लता दीदींचा गणपती देखील तिथेच घडतो. दादा सांगायचा,’’हळूहळू मूर्ती घडताना त्यात आपोआप जीव निर्माण होतो. एक एक अवयव घडताना तनाच्या सौंदर्याबरोबरच मनाचे सौंदर्य, त्यातील सात्विकता आपोआपच त्या मातीच्या गोळ्यातून उतरत जाते. एकेका रंगांबरोबर देवाचे देवपण त्या प्रत्येक मुर्तीत, अंगणात उतरणाऱ्या पहाटेच्या पहिल्यावहिल्या रेशमी किरणांसारखे अलवार उतरत जाते आणि मुर्ती मुर्त स्वरूप घेतले की, अखेरीस गजाननाच्या त्या मुर्तीकडे पाहताना तहान भूक हरपून जाते. मग वर्षभर ती रुपे मला एक वेगळीच उर्जा देत रहाते.’’
तिच उर्जा माझ्या मनात साठवण्यासाठी सवयीने बाहेर पडलेल्या मला आज ‘सिक्स पॅकस्’ असलेली गजाननाची मुर्ती अग्रस्थानी दिसली तर, शेजारीच चांदण्या पांघरलेले किरमिजी पितांबरधारी हातात त्रिशूळ आणि परशू असलेली दुसरी बाप्पाची मूर्ती शर्ट पँट नव्हे नव्हे बर्मुडा घातलेल्या एखाद्या शार्पशुटर सारख्या उभ्या असलेल्या बाप्पा समोर कावरीबावरी होऊन बसलेली ही दिसली. अरे काय हे? अरे तुमच्या कल्पनाविलासाच्या फटक्यांनी तुम्ही आपल्याच देवांच्या चिंध्या चिंध्या करताय रे…!!!
प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा संगम म्हणजे ‘गणपती’. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजानन वंदनेने होते. ‘गणपती बाप्पा’ हा बुद्धीचे दैवत आहे.’गजानन’ या शब्दाची फोड करायची झाली तर ‘ग’ म्हणजे ‘गभस्ती’ आणि गभस्ती म्हणजे ‘ प्रकाश‘. अंधार आणि प्रकाशाचं नातं हे निर्विवाद आहे. शकुन अपशकुनांच्या आयुष्यातील गझलांच्या ओळी बदलणाऱ्या चैतन्याची कळ म्हणजे ‘प्रकाश’ म्हणजे ‘श्री गजानन’. श्रावणाच्या सरींनी हिरव्या साऊल कला मंडपात भाद्रपदात येणाऱ्या विद्येचा ‘प्रकाश’ म्हणजे ‘श्री गजानन’! आई जगदंबेच्या देह दावणीतील दुधाचे चंद्रांमृत म्हणजे ‘श्री गजानन’!
निर्मितीचा, सृजनशीलतेचा प्रतिभावंतांच्या प्रज्ञेचा ‘प्रकाश’ म्हणजे ‘श्री गजानन’ विघ्नहर्ता असा हा देवांचा देव महादेव यांचा सुपुत्र. आपल्या निर्मितीच्या तंद्रीचे चढउतार कळेकळेपर्यंत क्षितिजाच्या पल्याड असलेल्या द्वैत अद्वैताचा आभास आपल्या ओंजळीत उतरवून बेभानपणे त्याच्यासमोर नाचणाऱ्या त्यांच्या भक्तांचे जीवन पावसाच्या पहिल्या कैफासारखा उदात्त, भव्य आकाशाच्या साऱ्या रंगाचे प्रकाश शलाकांनी उजळून टाकणारा तो आपला ‘श्री गजानन’!
‘गजानन’ या शब्दातील दुसरे अक्षर ‘जा’. ‘जा’ म्हणजे ‘जाग्रवी’ म्हणजे दक्ष, सावधता. साध्या, सोप्या, मर्यादित मध्यमवर्गीय आयुष्यातही प्रश्नाचे अनेकानेक काटेकुटे असतातच. पण एक सांगू? कितीही वेगवेगळी माणसं घेतली ना तरीही त्यांच्या आयुष्यातील प्रश्न हे थोड्याफार प्रमाणात एकसारखेच असतात. मग त्यात या गजाननाची ‘दक्षता’ जागृतता’आणि ‘सावधता’ हवीच हवी. आयुष्यातील दुःखाच्या या जमिनीची आपल्या सावध पण वत्सल हातांनी आंतरीक तसेच तात्विक विवेचनाचा चश्मा लावून जर आशावादी विचारांचे पीक काढले तरच या ‘गजाननातील’ ‘जा’ या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ‘सावधता’ तुमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात भरून राहील. असे केले तर मग एक गोष्ट सहजगत्या लक्षात येईल की, ‘प्रकाशाला पर्याय नसतो म्हणूनच दिशाभुलीच्या वाळवंटात न अडकता प्रक्षुब्ध आयुष्याच्या फाटक्या गाठोड्याला अमूर्त भक्तीची अनवट नक्षी घातली जाते. ‘गजानन’ या शब्दातील तिसरा आणि चौथा शब्द हा ‘न आहे आणि ‘न’ या शब्दाचा अर्थ आहे ‘नयुदी’ म्हणजे ‘नवीन पहाट’. आपल्या अनुभवसंपन्न आयुष्याची नवीन पहाट ही या गजाननाच्या आगमनाने आपल्या घरात होते.
जेव्हा मूर्त – अमूर्ततेचे आभास जसे निराश, निष्क्रिय माणसाच्या श्वासांची विरामचिन्हे आपल्या मोगरी आयुष्याला करपून टाकते तेव्हा हा विघ्नेश्वर ‘गजानन’ आपल्याला या भवसागरातून तारतो. आपल्या आयुष्यातील गुलमोहराला त्यांच्या आगमनाने नवीन आशेने फुलण्याच्या नव्या धुळवाटा देतो. आता त्यावर पावले टाकून फांदीवरचे चांदणे आपल्या अथक परिश्रमाने अंगणात उतरवायचे की ते तिथेच फांद्यात अडकवून ठेवायचे ते ज्याच त्यानेच ठरवायचे असते.
कसे आहे ना उदयदादाच्याच भाषेत सांगायचे झाले तर,“ प्रत्येक परगण्यातून भिरभिरत येणाऱ्या पक्ष्यांसारखे मातीतून आकार घेणाऱ्या या मूर्त्या मग त्या गजाननाच्या असोत अगर कुठल्याही देवदेवतांच्या त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत प्राक्तनगंधी बरेचसे प्रश्न सोडवून जातात. कुणाला ते उमगतात तर कुणाला नाही. ज्यांना ते उमगतात ते त्या प्रतिमेच्या अवतरणांचे मनाच्या संकल्प – विकल्पाच्या काव्य संकेत नातं गुंतून त्यातील शब्दांचे गंध आपल्या आयुष्याच्या आकाशात मिसळून आपले आयुष्य सप्तरंगी करतात. तर कुणी फक्त त्या गजाननाच्या मूर्तीकडे एक मातीची मूर्ती म्हणून पाहून, या चोरटिचकीकडे दुर्लक्ष करून गजाननाचे विसर्जन करून परत दुःखाच्या पडवीत संकटाच्या काळ्याशार ढगांशी झुंजत राहतात आणि अगदी शेवटी माझ्याच शब्दांत सांगायचं झालं तर,
‘हरवलेली गाय…
रानावनात शोधली…
पण…
परसदारी पाडस हंबरता…
पान्हाळली…
परत आली…
पान्हाळली…
परत आली…’