Friday, October 31, 2025
Happy Diwali

भव्यतेची भाषा

भव्यतेची भाषा

ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

भगवद्गीतेत संवाद आहे श्रीकृष्ण-अर्जुनाचा. त्याचा प्रेक्षक आहे संजय. श्रोते आहेत संजय आणि धृतराष्ट्र! यात संजयावर या रसमय, सखोल संवादाचा खूप परिणाम होतो. तो खूप आनंदित होतो असे वर्णन गीतेत आले आहे. या प्रसंगाचे कथन करताना ज्ञानियांच्या रसवंतीला असा बहर येतो की, त्या रसमय वर्णनाने आपलेही अंतःकरण पाझरत आनंदाने! ऐकूया अशा रसाळ ओव्या!

श्रीगुरूंच्या अद्भुत सामर्थ्याचे काय वर्णन करावे? असे संजयास वाटले. ‘धृतराष्ट्र राजास तसे बोलून संजय पुन्हा विस्मय पावला आणि त्याचा संजयपणाचा आठव मोडला. जशी रत्नाची प्रभा घटकेत चमकते आणि घटकेत बंद पडते.’

‘राया हें बोलतां विस्मित होये। तेणेंचि मोडावला ठाये। रत्नीं कीं रत्नकिळा ये। झांकोळीत जैसी॥ ओवी क्र. १६१३ किती सुंदर कल्पना आहे ही संजयासंबंधी! संजय हे जणू रत्न आहे. रत्नं तेजस्वी, मौल्यवान असतं. त्याप्रमाणे संजय आहे. त्याला श्रीकृष्ण संवादाचे मोल आहे. त्याची ओढ आहे, आतुरता आहे. मूळचा ज्ञानी, अभ्यासू संजय श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून अधिकच ज्ञानी झाला आहे. त्याच्या ठिकाणी तेज आहे. रत्नाप्रमाणे! रत्न क्षणात चमकते, क्षणात झाकोळते. ज्ञानदेवांच्या भाषेत हे सारे घटकेत घडते. हे जसे रत्नाच्या बाबतीत तसेच संजयाच्या बाबतीतही घडतं आहे. क्षणात तो त्या संवादात गुंग होऊन स्वतःला विसरतो; क्षणात तो भानावर येतो ‘संजय’ म्हणून! संजयाच्या संदर्भात घडणारी ही नाट्यमय घटना ज्ञानदेवांच्या प्रतिभेने अधिकच रंगतदार होते या कल्पनेतून;

परंतु ज्ञानदेवांची प्रतिभा केवळ या दृष्टान्तावर थांबत नाही, ते पुढे अजून तरल दाखला देतात. ‘हिमालय पर्वतावरील सरोवरांतील पाणी चंद्रोदय होताच गोठून ती स्फटिक मण्यांसारखी दिसतात आणि सूर्योदय झाला म्हणजे विरघळून पूर्ववत पाणी होते.’ ओवी क्र. १६१४

‘तसा संजय देहभानावर आल्यावर, श्रीकृष्णार्जुनांच्या संवादाची त्याच्या चित्तात आठवण होण्याबरोबर विस्मय होई.’ ओवी क्र. १६१५

शुभ्र हिमालय, त्यातील सरोवरांतील निर्मळ पाणी, शुभ्र चंद्रप्रकाशाने गोठून ते स्फटिक मण्यांप्रमाणे भासणं! किती अप्रतिम देखावा, चित्र रंगवलं आहे इथे! शुभ्रतेचं, निर्मळतेचं, मंद तेजाचं चित्र. संजय जणू हिमालय, मनाने पवित्र, म्हणून शुभ्र असणारा! त्याचं अंतःकरण हे सरोवर. ते अंतःकरण गोठून जाणं याचा अर्थ त्याचं भान हरपणं. नंतर सूर्योदयाबरोबर विरघळून पाणी होणं. इथे श्रीकृष्ण-अर्जुन संवाद म्हणजे जणू सूर्योदय. त्या संवादाने संजयाने भानावर येणं. संजयाच्या अंतरंगातील अलौकिक भाव ज्ञानदेव किती समर्थपणे रेखाटतात! त्याला किती भव्य, दिव्य रूप देतात! पर्वत, तोही कोणता वर्णिला? तर भव्य, दिव्य, शुभ्र, शीतल हिमालय. ते वाचताना, मनात पाहताना आपली दृष्टीही विस्फारते, विस्तारते. म्हणून म्हणावंसं वाटतं, जे जे भव्यदिव्य असे ते ज्ञानियांच्या ध्यानी असे पाहता आपल्या मनी वसे

manisharaorane196@gmail.com

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा