दरवाढीचा अधिक फायदा व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांचा आरोप
अमरावती : सणासुदीच्या दिवसात सातत्याने अनेक गोष्टींची दरवाढ (Price Hike) होत आहे. मात्र सोयाबीनला (Soybeans) वर्षभरात हमीभावदेखील मिळालेला नाही. अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर हे चार हजार रुपये क्विंटलवर स्थिरावले होते. परंतु आता महिन्याभरात हंगाम सुरू होत असताना सोयाबीनला ४ हजार ६०० रुपयांवर दर मिळाला आहे. शिवाय पाच-साडेपाच हजारांवर स्थिरावलेल्या हरभऱ्यालाही पहिल्यांदा ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
गतवर्षीच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सरासरी उत्पन्न कमी आल्याने सोयाबीनची मागणी वाढून दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यादरम्यान वर्षभरात प्रत्यक्षात सोयाबीनला हमीभाव मिळाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली.
त्यानंतर आता दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा न होता व्यापाऱ्यांनाच फायदा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंदा केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे सोयाबीनला सद्यस्थितीत मिळत असलेला ४ हजार ६०० रुपये क्विंटल हा दर हमीभावापेक्षा कमीच आहे.
सणासुदीच्या दिवसात हरभऱ्याची दरवाढ
दोन महिन्यांपासून सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे चणाडाळीची मागणी वाढली व पर्यायाने हरभऱ्याचीही दरवाढ झालेली आहे. नवीन हरभरा मार्केटमध्ये विक्रीला यायला चार ते पाच महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. येथील बाजार समितीमध्ये १०४ पोत्यांची आवक झाली.