तब्बल अकरा दिवस होता फरार, इमारतीच्या गेटवरच झाली अटक
सिंधुदुर्ग/ मुंबई : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळण्याची दुर्घटना झाल्यानंतर जयदीप आपटे हा फरार झाला होता. घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी फरार जयदीप आपटेला बुधवारी पोलिसांनी पकडले आहे. यानंतर जयदीप आपटेला गुरुवारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली होती. बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला. गुरुवारी जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणण्यात आले. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर पार पडली. या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्याने त्यालाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. चेतन पाटीललाही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी
मी परवाच सांगितले होते, आपटे पळून पळून कुठे जाणार आहे. त्याची चौकशी होईल कठोर कारवाई होईल. या प्रकरणातील दोषीला; मग तो कोणीही असो त्याला सरकार सोडणार नाही. जे लोक अफवा पसरवत होते, त्यांना चपराक मिळाली आहे. छत्रपती आराध्य दैवत आहे, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना झाली, त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे, या घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अशी झाली जयदीप आपटेला अटक?
जयदीप आपटे हा कसाऱ्याहून लोकल ट्रेनने कल्याणमध्ये आला. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर तो रिक्षामध्ये बसला. रिक्षाने तो दूध नाका परिसरात आला. कुणाला ओळखता येऊ नये म्हणून त्याने डोक्यावर टोपी घातली होती आणि चेहरा मास्कने झाकलेला होता. जयदीप आपटेच्या हातात दोन बॅगा होत्या. कसाऱ्याहून जयदीप आपटे त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. इमारतीच्या गेटपर्यंत जयदीप आपटे पोहोचला. इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त लावलेला होता. पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र बघून आत सोडले जात होते. इमारतीच्या गेटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेकडे ओळखपत्र मागितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला न्याहाळून पाहिले, तेव्हा त्यांना संशय आला. एका कर्मचाऱ्याने त्याचे नाव घेत आवाज दिला आणि घाबरलेला जयदीप आपटे रडायला लागला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
घरात जाण्यासाठी जयदीप पोलिसांना आग्रह करत होता. मात्र, परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे इमारतीच्या खाली जयदीपची आई आणि पत्नी पोलिसांच्या गाडीपर्यंत आले. प्राथमिक चौकशीनंतर जयदीपला रितसर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.