अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दु:खाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते; कारण भक्ती म्हणजे आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्ती विणा भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंतावाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. ‘मी नाही आणि तू (म्हणजे भगवंत) आहेस,’ किंवा ‘मी तोच (म्हणजे भगवंत) आहे’ असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे, हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे.


आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वहात आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहाते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील? भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंत:करण खरोखर, कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंत:करणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील.


तात्पर्य : सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,