Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीअभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही

अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दु:खाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते; कारण भक्ती म्हणजे आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्ती विणा भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंतावाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. ‘मी नाही आणि तू (म्हणजे भगवंत) आहेस,’ किंवा ‘मी तोच (म्हणजे भगवंत) आहे’ असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे, हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे.

आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वहात आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहाते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील? भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंत:करण खरोखर, कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंत:करणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील.

तात्पर्य : सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -