मुंबई: ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिकेतील पहिला सामना एडिनबर्ग येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने तुफानी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॉवरप्लेमद्ये ११३ धावा केल्या.
टी-२० आंतरराष्ट्रीयच्या इतिहासात हा एखाद्या संघाचा पॉवरप्लेमधील सर्वात मोठा स्कोर आहे. याआधी दक्षिण आफ्रिकाने वेस्ट इंडिजविरुद्ध २६ मार्च २०२३ला सेंच्युरियनमध्ये १०२ धावा केल्या होत्या.
सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या बॉलवरच जेक फ्रेजर मॅकगर्कची विकेट गमावली होती. मात्र यानंतर ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी वादळ आणले.
दोघांनी ११३ धावांची पार्टनरशिप केली. हेडने २५ बॉलमध्ये ८० धावा केल्या. यात १२ चौकार आणि पाच षटकार यांचा समावेश आहे. हेडने केवळ १७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एखाद्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे संयुक्तपणे सगळ्यात वेगवान अर्धशतक आहे. मार्कस स्टॉयनिसनेही इतक्याच बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते.
कर्णधार मिशेल मार्शने १२ बॉलमध्ये ३९ धावा ठोकल्या. यात ५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ९.४ षटकांतच पूर्ण केले.