मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम सुलभ करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल.
या ब्लॉक दरम्यान,सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप जलद मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावतील आणि या गाड्या गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर जातील.
गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या पाचव्या मार्गावर धावतील आणि प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत.
याशिवाय, काही चर्चगेट-बोरिवली धीम्या गाड्या गोरेगाव स्थानकावर खंडित केल्या जातील. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांना अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.