मूळ पगारात ६५०० रुपयांची वाढ
एसटीच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे झाले हाल
मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कमिटीच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ६५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. सातवा वेतन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. आज दिवसभर सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. बुधवारी दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगार पुर्णतः बंद होते. ९२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ६५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस बाकी असताना एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गाव गाठायचे कसे? कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार? असे प्रश्न चाकरमान्यांना पडले होते.मात्र संपामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर बुधवारी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२० पासून सरसकट मुळ वेतनात ६५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.