Sunday, March 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यएस्कॉर्ट गर्ल! थोडक्यात विकत घेतलेला जोडीदार!!

एस्कॉर्ट गर्ल! थोडक्यात विकत घेतलेला जोडीदार!!

आजच्या लेखातून आपण एस्कॉर्ट गर्ल ही संकल्पना जाणून घेणार आहोत. संकल्पनेचे नाव जरी नवीन वाटतं असलं, पाश्चात्त्य वाटतं असलं तरी ही सवय अथवा ही जीवनशैली आपण कायमच पाहत आलोय, अगदी आपल्या सर्वसामान्य समाजात, आजूबाजूला हे सर्व बेधडकपणे सुरू आहे. अत्यंत हाय फाय किंवा श्रीमंत, पैसेवाले, मोठ्या शहरातले, उच्चब्रू लोकांमध्येच ही सवय, छंद जोपासला जात असेल, हे मोठ्या लोकांचे चोचले असतील असे आपल्याला वाटतं असेल तर ते साफ चुकीचं आहे. अगदी सर्वसाधारण घरातील पण पैसा हाताशी असलेले लोकं आजकाल हा प्रकार करताना दिसतात. आपल्याकडे विविध विषयांवर समुपदेशनला येणाऱ्या अनेक विवाहित पुरुषांमध्ये काही नक्कीच असे असतात जे कुठल्या तरी महिलेच्या प्रकरणात अडकलेले असतात. हे प्रकरण नेमके कोणत्या लेव्हलला गेल्यावर त्यांना जाणीव होऊन ते स्वतः काऊनसेलिंगचा निर्णय घेतात यावर त्यांची त्यातून कोणतेही नुकसान न होता अलगद सुटका होणे अवलंबून असते.

सेवाव्रती – शिबानी जोशी

चला तर मग जाणून घेऊया काय असते एस्कॉर्ट गर्ल? काय करते ती? काय असतात तिची कामं? लक्षणं? कोण आणि कसे, का वापरते तिला? कुठे वापरले जाते ती? यातून स्त्री आणि पुरुष दोघांचा काय फायदा होतो आणि याचे पुरुषांच्या आयुष्यावर काय दुष्परिणाम होतात? या एस्कॉर्ट गर्ल शक्यतो पुरुषापेक्षा खूप कमी वयाच्या, तरुण आणि विनापाश असतात. म्हणजेच त्या विवाहित नसतात किंवा घटस्फोटित अथवा विधवा असतात, एकट्या असतात, मोकळ्या असतात. त्यांना या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही कामं अथवा करिअर नसते. त्यांच्यावर कुटुंब, मुलं ही जबाबदारी नसते असली तरी त्यांनी ती झिडकारलेली असते आणि पूर्ण वेळ या व्यवसायाला दिलेला असतो. संबंधित पुरुषाच्या कोणत्याही भाव भावनामध्ये न अडकता केवळ पैसा कमवणे आणि उदर निर्वाह करणे हा या व्यवसायातील हेतू असतो.स्वतःला पती असताना पण जास्त आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला असतो, तर कधी चांगळवादी वृत्ती, उच्च जीवन शैली जी नवऱ्याच्या उत्पन्नात मिळू शकत नाही ती सहजासहजी मिळवण्यासाठी या महिला असे डील स्वीकारतात. अनेकदा घरातील व्यक्तींना त्या कोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवत आहेत हे माहिती नसतं किंवा त्यांच्यावर स्वतःच्या घरातील कोणाचं काही बंधन नसतं, मर्यादा नसतात. घरातील सगळ्यांची मूक संमती असते कारण त्या मोठ्या प्रमाणात स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक फायदा पुरुषांकडून करून घेत असतात. दर वेळी पुरुषाला सोबत करण्याच्या बदल्यात या महिला पैसाच घेतात असे नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून त्या स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असतात.

अत्यंत उच्च राहणीमान, सतत हाय फाय खरेदी, कपडे, गिफ्ट्स, दागदागिने, आऊटिंग, हिंडणे, मोठ्या टूर्स करणे, ब्युटी पार्लर, मेकअप सामान, हॉटेलिंग इथपासून ते स्वतःचा मोबाइल रिचार्ज करणे असो वा त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा, घर, गाडी, बंगला घेणेपासून ते स्वतःची प्रत्येक आर्थिक गरज त्यांनी या पुरुषाकडून भागवलेली असते. स्वतःचा वेळ पुरुषांना देऊन, त्याची मन मर्जी राखून सर्व हौस-मौज त्या पूर्ण करून घेत असतात. शक्यतो अति पैसेवाले, खूप कमाई असणारे, मोकळ्या हाताने खर्च करणारे, हौशी, मौज-मजेची आवड असणारे, कुटुंबाला जास्त महत्त्व न देणारे, कुटुंबाच्या बंधनात स्वतःला अडकवून न घेणारे, स्वतंत्र वृत्तीने जगणारे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन राहणारे, एकटे राहणारे, घटस्फोटित, विदुर, कामानिमित्त, व्यावसायिक कारणाने घरापासून लांब राहणारे, फॅमिलीपासून तुटलेले, घरगुती नातेसंबंध विस्कळीत असल्यामुळे घरापासून लांब राहणारे, अथवा घरातील सदस्य अगदीच हतबल, मजबुरी असल्यास, सर्व निर्णय पुरुषाच्या हातात असलेल्या, ज्या घरातील महिलांना किंमत अथवा महत्त्व नाही, घरातील महिलांना दाबून ठेऊ शकणारे पुरुष या महिला स्वतःचा ग्राहक म्हणून बघतात, जेणेकरून त्यांना कोणापासून कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांचं उत्पन्न सुरळीत सुरू राहील.

मोठ्या शहरांमध्ये अशा एस्कॉर्ट गर्ल पुरवणाऱ्या एजेन्सी कार्यरत आहेत, तर लहान शहर, गाव या ठिकाणी ओळखीतून, परिचयातून, नेटवर्कमधून अशा महिलांना जोडून देण्यात येते किंवा त्या स्वतः त्यांच्या चॉईस आणि गरजेनुसार पुरुषांना शोधून त्यांना कनेक्ट होतात. काही ठिकाणी पुरुष स्वतः या एस्कॉर्ट गर्लला एजेन्सीमार्फत, ओळखीतून अथवा वैयक्तिकरीत्या संपर्क साधून त्यांच्याशी संबंध सुरू करतात. ऑनलाईन माध्यमातून, विविध अॅप्लिकेशनमध्ये नाव नोंदणी करून पण अशा जोड्या जुळतात. कोणा एजेन्सी अथवा मध्यस्थामार्फत हे स्त्री-पुरुष जोडले गेल्यास त्यांना कमिशन देखील दिले जाते. सर्वसामान्य पद्धतीने अनेकदा प्रेम, भावना इत्यादींपासून प्रेम प्रकरण सुरू करून अशा पटकन उपलब्ध होणाऱ्या महिलेला एस्कॉर्ट गर्ल म्हणून कळत-नकळत तयार केलं जातं, वापरलं जातं आणि ती या संबंधाला नातं, प्रेम, हक्क, अधिकार, द्वितीय पत्नी म्हणून पाहू लागते. कारण तिला पुरुषाच्या मुख्य हेतूची अजिबात कल्पना नसते. पुरुषाची मागणी ज्याप्रमाणे असेल त्यानुसार या महिलांना काम करावं लागतं. त्याच्यासोबत हवं तेव्हा राहणं, कुठेही जाणं- येणं, त्याच्या ऑफिस अथवा व्यावसायिक मीटिंग, सामाजिक किंवा कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम, पार्टी, लंच, डिनर, कलाईन्ट, प्रोग्राम, दौरे, कॉन्फरन्स यात सहभागी होणे, त्याचा व्यवसाय वगैरे शक्य तितका सांभाळून त्यात योगदान देणे, त्याची वैयक्तिक कामं, काळजी, सेवा करणे, कुठे कसं वागायचं आहे, बोलायचं आहे, कोणाला कसं अटेंड करायचं आहे इथपासून ते तिने प्रत्येक ठिकाणी काय कोणता कसा रोल करायचा आहे, काय कपडे घालायचे आहेत, कोणाशी कसं बोलायचं आहे हे संबंधित पुरुष ठरवतो आणि तसे करण्याबदल्यात तिच्यावर समाधानकारक पैसा खर्च करतो. आता अशा महिलांना तर सर्व बाजूने फायदा होत असतो म्हणून त्या असे संबंध बिनधास्त आणि हेतू समोर ठेऊनच करतात. ज्या पुरुषांना त्या टार्गेट करत असतात त्यांना मात्र अशा महिलांना स्वतःसोबत बाळगण्याची मोठी किंमत मोजावी लागते. आपल्याकडे समुपदेशनला आलेल्या काही केसेसमध्ये एस्कॉर्ट गर्लमध्ये पूर्ण गुरफटून गेल्याने, त्यांच्या अट्टहास आणि लोभीपणामुळे खूप आर्थिक फटका बसलेले पुरुष पच्छाताप करताना दिसतात. अगदी पन्नाशी ओलांडलेले पुरुष सुद्धा स्वतःपेक्षा अत्यंत कमी वयाच्या बाईसोबत ठेवलेल्या चुकीच्या रिलेशनमुळे कुटुंबापासून, उद्योग धंद्यापासून, समाजापासून, घरापासून दूर गेलेले दिसतात.

समुपदेशनमध्ये आलेल्या जास्त प्रकरणात पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक तब्बेतीची जास्त हानी झाल्याचं दिसून येते. पैसे गेले, दिवाळं निघालं, फसवणूक झाली, प्रॉपर्टी विकावी लागली, कष्ट करून मिळवलेला पैसा वाया गेला याहीपेक्षा उतार वयात त्यांना जे विविध आजार लागले त्यामुळे ते जास्त उद्ध्वस्त, उद्विग्न झालेले असतात. पुरुषांना पटकन हे लक्षात आलेले नसते की अशा महिला कधीही कोणा एकाशी प्रामाणिक नसतात, ते लग्नाचं किंवा कायदेशीर नातं नसतं. ही महिला आपल्या जवळच टिकावी आणि राहावी म्हणून तिला सतत खूश ठेवण्याच्या नादात, तिला हवं ते पुरवण्याच्या नादात, तिने आपल्याला सोडू नये म्हणून तिला नाराज होऊ न देणं, सतत तिला भाव देणं, ही जणू त्या पुरुषाची जबाबदारी बनून जाते. हा पुरुष त्या महिलेवर इतका अवलंबून राहायला लागतो की, त्याला तिच्या नसल्याने आयुष्यात खूप मोठं नुकसान होईल ही भीतीच मनात बसते. आपल्याकडे आपल्या कायदेशीर आणि विधिवत लग्न केलेल्या वैवाहिक जोडीदाराव्यतिरिक्त जेव्हा पुरुष इतर ठिकाणी एखाद्या परस्त्रीशी अनैतिक संबंध ठेवतो तेव्हा अनेकदा स्वतःची बाजू सेफ ठेवायला, हे बेकायदेशीर नातं समाजात चुकीच्या पद्धतीने पसरू नये, बदनामी होऊ नये, दोघांना समाजात मान-सन्मान मिळावा, चुकीचे संबंध उघड होऊ नयेत म्हणून त्याला दुसरं लग्न अथवा दुसरी बायको किंवा प्रेम संबंध अशी ओळख दिली जाते.

या एस्कॉर्ट गर्ल कालांतराने संबंधित पुरुषाकडून पत्नीचा दर्जा मिळावा, अधिकार मिळावेत, नाव मिळावं म्हणून त्याला ब्लॅकमेल करू लागतात, त्याच्यावर भावनिक अत्याचार करू लागतात. आपल्या हिंदू विवाह कायद्याने प्रथम लग्नाची पत्नी हयात असताना, पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना कोणताही पुरुष दुसरं लग्न करू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. तरी देखील जेव्हा अशा पुरुषाला त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री कायमस्वरूपी हवी असते, अथवा एखाद्या स्त्रीला अशा विवाहित पुरुषासोबत राहायचे असते तेव्हा ती फक्त त्याच्या सर्व प्रकरच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा, इच्छा भागविण्यासाठी, त्याला सोबत करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी, त्याच्यासोबत हिंडण्या-फिरण्यासाठी, समाजात वावरताना त्याला जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे, अगदी त्याच्या घरात सुद्धा त्याच्यासोबत पैशाच्या मोबदल्यात राहत असते. पैशाच्या अथवा कोणत्याही फायद्यासाठी त्या मोबदल्यात कोणत्याही स्त्रीने पुरुषाला सर्व प्रकारची सेवा पुरवणारी म्हणजेच एस्कॉर्ट गर्ल म्हणून ही संकल्पना ओळखली जाते. अशाप्रकारे एखाद्या विवाहित पुरुषासोबत थोड्या वेळापासून ते अनेक वर्षांच्या कालावधीसाठी, दिवसातून फक्त काही तासापासून ते चोवीस तासांपर्यंत जी या पुरुषांना सोबत देते, सहवास देते तिला एस्कॉर्ट गर्ल म्हटले जाते. या मोहजाळ माया जाळात तिच्या धुंदीत तो इतका फसत जातो की त्याला स्वतःची फॅमिली, तब्बेत, नोकरी, उद्योग धंदा, सामाजिक संबंध, कमकुवत होत चाललेली आर्थिक बाजू वेळेत लक्षात येत नाही. स्वतःसमोर कर्जाचे डोंगर उभे राहिल्यावर, उत्पन्न कमी झाल्यावर अथवा बंद पडल्यावर आपल्या तब्बेतीची पूर्ण खराबी झाल्यावर, चांगली लोकं, मित्र दुरावल्यावर, वय झाल्यावर पुरुषांना जाणीव होते की, आपण खूप मोठी चूक केली आहे आणि अनेकदा असे पाहायला मिळते की, त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे कोणीही अशा स्वरूपाच्या फसव्या आणि खोट्या नात्याला आयुष्य समजून घोडचूक करत असाल, तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. स्त्री असो वा पुरुष कितीही हुशार असले, प्रॅक्टिकल असले, श्रीमंत असले तरी जीवनातील काही चुकीच्या वागणुकीमुळे झालेलं नुकसान कधीच भरून निघत नाही. सावध राहा, सतर्क राहा आयुष्यातील प्रत्येक पाऊल जपून टाका! कारण आयुष्याला वन्स मोअर नाही…

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -