मुंबई : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगाव येथील तत्कालिन पोलीस अधिक्षकावर दबाव आणल्याचा आरोप आहे. याच आरोपातून आता त्यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवले आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये आता अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.