मागण्या मान्य करण्यासाठी पहाटेपासून कर्मचाऱ्यांचा संप
मुंबई : गणरायाच्या (Ganeshotsav) आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक चाकरमानी आपल्या गावाकडे जातात. उत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी उसळलेली असतानाच एसटी (ST Bus) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक (Employees Strike) दिली आहे. संपूर्ण राज्यभरात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या धरणे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर २०१६ पासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करण्यात यावी या मागण्या घेऊन एसटी कर्मचारी आज सकाळपासून संपावर गेले आहेत. मुंबई पुणे, अकोला, अमरावती, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांतून धावणाऱ्या एसटी बस पहाटेपासून डेपोमध्येच उभ्या आहेत. एसटी कामगार संघटनेकडून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं आणि निषेध केला जाणार असून इतर कर्मचाऱ्यांचा या संपाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लालपरीची चाके ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, याआधीही २०२१ मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन संप पुकारला होता. तेव्हा तब्बल ५४ दिवस एसटी बसची चाके थांबली होती. आता ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागातील एसटी वाहतूक सुरु आणि बंद?
- मुंबई, विदर्भ, कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे.
- तर ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभाग, पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव, सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. त्याचबरोबर खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांकडून संपामुळे महामंडळाकडून नियोजनाची सुरुवात
गणेशोत्सवात प्रशासनाकडून जादा बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिल्याने याचा परिणाम गणेशोत्सव विशेष गाड्यांवर होवू नये यासाठी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. बसस्थानकावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा यासंदर्भात सूचना देखील करण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील केले जात आहे. आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाला देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.